माथेरान ःप्रवाशांना ई रिक्षातून वाहतुकीची सेवा देत असताना इथल्या जनतेची सेवा करण्यासाठी श्रमिक रिक्षा संघटनेच्या सदस्या अनिता गणपत रांजाणे यांनी नुकताच पार पडलेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सहभाग घेऊन प्रभाग क्र.7 मधून अनुसूचित जमाती करिता उमेदवारी जाहीर करून आपल्या कर्तृत्वावर या निवडणुकीत विजय संपादन केला आहे.
माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून अनिता रांजाणे निवडणुकीला सामोऱ्या गेल्या होत्या.अत्यंत अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला आहे.
प्रभाग क्र.7 मधील काही द्वेषी मंडळींनी अनिता रांजाणे या स्वच्छ प्रतिमेच्या आणि सेवाभावी वृत्तीच्या असल्यामुळे त्यांना पराभूत करण्यासाठी देव पाण्यात ठेऊन जंगजंग पछाडले होते.पण कष्टकरी महिला अनिता रांजाणे यांना पराभूत करणे त्यांना सहज शक्य झाले नाही.