माथेरान : मिलिंद कदम
माथेरान नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून आज येथील विविध प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये महिलांचे प्राबल्य दिसून आले आहे. येणार्या सभागृहामध्ये महिलाराज असणार हे यावरून निश्चित झाले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचालींना सुरुवात झाली असून कालच नगराध्यक्ष पदासाठी खुला प्रवर्ग जाहीर झाला आहे. यानंतर आज स्थानिक प्रभाग रचना महिला आरक्षण आणि सोडत कार्यक्रम करण्यात आला. माथेरान नगरपलिकेत एकूण 20 नगरसेवक जाणार असून त्यातील 10 म्हणजे 50 टक्के महिला असणार आहेत. त्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढण्यात आली.
माथेरान नगरपलिकेतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:30 वाजता आरक्षण सोडत घेण्यात आली. मुख्याधिकारी राहुल इंगळे, अधीक्षक तथा तहसीलदार सुरेंद्र सिंग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडत घेण्यात आली.
पीठासीन अधिकारी प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय विध्यार्थी मिसबाह महापुळे, मीरा आखाडे आणि हार्दिक शिंदे यांच्या हातून चिठ्ठी काढून आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग 3 महिला,अनुसूचित जाती 2 महिला,अनुसूचित जमाती 1 महिला,आणि सर्वसाधारण 4 महिला असे एकूण 10 महिलांना संधी मिळणार आहे.