Matheran Charlotte Lake desilting pudhari photo
रायगड

Matheran News : शार्लोट तलाव गाळमुक्त न होताच बिले अदा

माथेरान नगरपालिकेमधील धक्कादायक प्रकार, नागरिकांतून संताप, सखोल चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

माथेरान : मिलिंद कदम

माथेरानला काही महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मागील दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे शारलोट तलावातील गाळ काढणे आणि अन्य कामांसाठी जवळपास पाच कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. यातील काही गाळ काढला असून मुख्य तलावात मोठया प्रमाणावर गाळ शिल्लक असताना सुध्दा या ठेकेदारांना जवळपास मोठया रक्कमेची बिले अदा करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

मलनिस्सारण प्रकल्पासारखी महत्वपूर्ण कामे मुदतीत पूर्ण होत नसून या होणाऱ्या कामांना विलंब होत असल्याने काही भागातील कामे निकृष्ठ दर्जाची होत असताना सुध्दा प्रशासनाने करोडो रुपयांची बिले अदा केल्याने ठस्थानिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने ठेकेदारांचे लांगुलचालन बंद करावे अशी मागणी स्थानिक करत आहेत.

शारलोट तलाव स्वच्छ करण्यासाठी गाळ मुक्त करण्यासाठी पावसाळ्यात दरवाजा उघडून सर्व पाणी सोडले जाते. सद्यस्थितीत जर का ह्या तलावाचा गेट उघडला तर संपूर्ण गाळ खाली वाहून जाणार आहे.दोन हजार ट्रक गाळ काढून तो दोन किलोमीटर अंतरावर वाहतूक करून साठवून ठेवण्याची अट निविदेत नमूद केलेले असताना फक्त काही प्रमाणात गाळाच्या गोण्या भरून ठेवल्या आहेत.

ही सर्व माती भविष्यात इथले रस्ते बनविण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने क्ले पेव्हर रस्त्याना छत्रपती शिवाजी महाराज रोड पर्यंत परवानगी दिली आहे त्यापुढे बहुतेक रस्ते दगड मातीच्या साहाय्याने बनवावे लागणार आहेत. त्यामुळे लेक मधील हा गाळ अन्य रस्त्यांच्या कामासाठी उपयोगी पडू शकतो.

निविदेप्रमाणे अटींचे पालन ठेकेदाराने केले नाही तर त्याला काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी मनोज खेडकर यांनी केली आहे.गाळ काढण्यासाठी तलावाचा गेट उघडून माती पाण्यात सोडणे म्हणजे एकप्रकारे भ्रष्टाचाराला साथ देण्यासारखे असल्याचा आरोप सुध्दा मनोज खेडकर यांनी केला आहे.

शारलोट लेकमधील गाळ नदी मार्गे वाहून बाजूच्या मोरबे धरणाच्या जलसाठ्यावर परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले.गाळ काढण्याचा विषय भावनिक न बनवता व्यावहारिक दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे नमूद करताना खेडकर म्हणाले की गाळ पाण्यात सोडण्याचा फायदा केवळ ठेकेदारांना होईल तीच माती जतन केल्यास भविष्यात कमी खर्चात रस्ते दुरुस्ती करता येईल आणि पर्यटकांना चांगले चालण्यायोग्य रस्ते उपलब्ध करून देता येतील.माथेरानच्या पर्यावरण, पाणीपुरवठा आणि विकासाच्या दृष्टीने नागरिकांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहावे असे आवाहन मनोज खेडकर यांनी केले आहे.

गाळ राहिल्याने पाणीटंचाई

निविदेत नमूद केल्याप्रमाणे तलावातील संपूर्ण गाळ काढणे अनिवार्य असताना देखील गाळ तसाच राहिल्याने पाण्याचा तुटवडा भासत आहे. याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागविली असता पालिका प्रशासनाच्यावतीने ठेकेदाराच्या बाजूने मोगम उत्तर देऊन वेळ मारून नेली आहे. या कामात मोठया प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे स्वतः सत्तेतील नगरसेवकच बोलू लागल्याने या मध्ये काहीतरी तथ्य असणार अशी कुजबुज सुरू झाली आहे.

आता हा गाळ पूर्णपणे न काढता लेक मधील पाणी सोडून त्या पाण्याबरोबर हा गाळ वाहून जाण्यासाठी ठेकेदाराची एकप्रकारे पाठराखण करण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या दिसत आहेत.ही गाळाची माती खाली वाहून गेल्यास इथल्या पर्यावरणाचे नुकसान होणार आहे.
मनोज खेडकर, नगरसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT