महाड (श्रीकृष्ण द बाळ) : बीड जिल्ह्यातील माकसाजोग येथील संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आणि त्यांच्या कुटुंबाला आजवर न्याय न मिळण्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, "देशमुख कुटुंबीयांनी आपली भूमिका ठामपणे मांडली पाहिजे. या प्रकरणात कोणत्याही परिस्थितीत आरोपींवरून मोक्का काढून घेऊ दिला जाणार नाही."
रायगडावर दोन भाविकांना भोवळ:
शिवराज्याभिषेकाच्या कार्यक्रमादरम्यान दोन भाविकांना भोवळ आल्याने त्यांना तातडीने रोपवेने खाली आणण्यात आले आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. याची विचारपूस स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी केली.
मराठा समाजाला २९ ऑगस्ट रोजी आरक्षण मिळणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करत, जर हे आरक्षण मिळालं तर पुढील १०० वर्षांसाठी समाजासाठी उपयुक्त ठरेल असेही त्यांनी सांगितले. "आरक्षण कुणाच्या बापाची जहागिरी नाही. हे आमचा हक्क आहे आणि ते घेऊनच दाखवू. कोणीही अडवू शकत नाही," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मनोज जरांगे पाटील रायगडावर महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले होते. त्यांनी स्पष्ट केलं की, राज्य भयमुक्त आणि सुव्यवस्थित राहावे, यासाठी आपण शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडावर आलो आहोत.