खालापूर : विधानसभा निवडणूकीची रणधुमाळीत शासकीय अधिकार्यांना लागलेल्या निवडणूक ड्यूटीचा फायदा खालापूरातील मुंगुर उत्पादकांनी घेतला आहे. धामणी गावाच्या हद्दीतून राजरोस मुंगुर उत्पादन होत आहे. विदेशी मुंगूर माशांच्या मत्स्यसंवर्धनावर राष्ट्रीय हरित लवाद, नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये बंदी घातलेली आहे. मानवी आरोग्यास घातक मुंगुर माशाचे प्रजनन खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात केले जाते.
गेल्या वर्षी मत्स्य विभाग रायगड यांनी स्थानिक, समाजसेवी संस्थाच्या तक्रारीनंतर कारवाई केली परंतु कारवाई सातत्य नसल्याने मुंगुर प्रजनन अद्याप खालापूरात सुरू आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे पाताळगंगा नदीलगत हे तलाव असून मोठ्या प्रमाणात मुंगूर माशाची पैदास केली जाते.
नदीकिनारी असलेल्या या तलावातील पाणी गटारातील पाण्यापेक्षा घाण आणि दुर्गंधीयुक्त आहे. सडलेले खाद्य मुंगूर माशांना खायला दिले जाते. दुर्गंधीने सर्व परिसर भरून जातो. तलावातील घाण पाणी नदीपात्रात सोडली जात असल्याने पाताळगंगा प्रदूषीत होत आहे. तालुक्यातील अनेक ग्रा.प.च्या पिण्याच्या पाण्याची योजना पातळगंगा नदीवर कार्यान्वित आहेत. त्यामुळे शेकडो कुटुंबांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. कुंभिवली ग्रा.पं. हद्दीत धामणी गावात नदीकिनारी तलावात मोठ्या प्रमाणात मुंगुर उत्पादन घेतले जात असून दररोज टनावरी माल भरून पनवेल आणि मुंबईकडे रवाना होत आहे. मोठा मलिदा मुंगुर उत्पादक विविध शासकीय विभागाला देत असल्याने मुंगुरचा नायनाटासाठी स्थानिक उग्र आंदोलनाच्या तयारीत आहेत.
मुंगुर प्रजनन आणि उत्पादन बेकायदेशीर पणे करणार्या व्यावसायिकांना विद्युत पुरवठा सहज उपलब्ध होत आहे. शिवाय वनविभागाच्या जागेतून रस्ता असे लागेबांधे आहेत. यामुळे संयुक्त कारवाईसाठी गेल्यावर्षी मत्स्य विभाग रायगड यांनी पाटबंधारे विभाग, महावितरण, परिवहन विभाग, संबंधित ग्रामपंचायत सरपंच, पोलीस विभाग, गटविकास अधिकारी, प्रदूषण नियमक मंडळाचे अधिकारी यांची बैठक अलिबाग येथे आयोजित केली होती. त्यानंतर महड हद्दीत तलावावर कारवाई झाली परंतु नंतर कारवाई थंडावली.
अपुरे मनुष्यबळ यामुळे कारवाईसाठी मत्स्य विभाग रायगड यांना मर्यादा असल्याचे संजय पाटील सहाय्यक आयुक्त मत्स्य विभाग रायगड यांनी सांगितले होते. त्यातच आता निवडणूक ड्यूटी यामुळे कारवाईला लवकर मुहर्त मिळणार नसल्याने मुंगुर उत्पादक बिनधास्त झाले आहेत.
मुंगुर प्रजनन तलाव बंद व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. बनावट पर्यावरण संस्था स्थापन करून काही जण मुंगुर उत्पादकांना कडून हप्ता घेत पाठीशी घालत आहेत. परंतु कित्येक गावातील पेयजल योजना दूषित होत असून शासन दुर्लक्ष करत असेल तर आता आरपारची लढाई लढावी लागेल.शितलकुमार वाघरे, तक्रारदार, शेतकरी खालापूर