Mangaon Zilla Parishad Election Pudhari
रायगड

Mangaon Zilla Parishad Election: माणगाव पंचायत समितीवर पुन्हा भगवा; जिल्हा परिषदेत शिवसेना–राष्ट्रवादीत बरोबरी

तटकरे–गोगावले यांची प्रतिष्ठेची लढत; शिवसेनेची जोरदार मुसंडी, राष्ट्रवादीचे बालेकिल्ले अबाधित

पुढारी वृत्तसेवा

माणगाव : कमलाकर होवाळ

संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष वेधून राहिलेल्या माणगाव तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या 4 जागांपैकी प्रत्येकी 2 जिल्हा परिषद गटांवर शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले असून माणगाव पंचायत समितीवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. माणगाव येथील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे खा.सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे व शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिष्ठेची केली होती. यामध्ये शिवसेना पक्षाने जोरदार मुसंडी मारली. जिल्हा परिषदेच्या 2 जागा व पंचायत समितीच्या 5 जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्यावर माणगाव तहसील कार्यालय येथील मैदानात शिवसैनिकांनी घोषणाबाजी व गुलालाची उधळण करीत जयघोष केला.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा मोर्बा जिल्हा परिषद गट व मोर्बा पंचायत समिती गणातून तसेच तळाशेत जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण व साई पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आल्यावर राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला. माणगाव तहसील कार्यालय याठिकाणी निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा माणगावचे प्रांताधिकारी डॉ.संदीपान सानप यांच्या अधिपत्याखाली सोमवार 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. या मतमोजणीवेळी तहसील कार्यालय माणगाव याठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी सविता सविता गर्जे व माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

तालुक्यातील निजामपूर जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे अविनाश नलावडे विजयी झाले. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार राजिपचे माजी सभापती ॲड. राजीव साबळे यांचा पराभव केला. तळाशेत जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिशा दिपक जाधव या विजयी झाल्या. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार राजिपच्या माजी सदस्या स्वाती नवगणे यांचा दारुण पराभव केला. मोर्बा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा परिषद सभापती अस्लम राऊत यांनी आपले कट्टर प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे रमेश मोरे यांचा पराभव केला. गोरेगाव जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे दिनेश हरवंडकर यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत गोरेगावकर यांचा पराभव केला.

माणगाव पंचायत समिती निवडणुकीत पाटणूस पंचायत समिती गणातून शिवसेनेचे विलास शिंदे, निजामपूर पंचायत समिती गणातून शिवसेनेचे अक्षय जाधव, तळाशेत पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मनीषा मालोरे, साई पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पंचायत समिती सदस्या तथा तालुका महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा संगीता संजय बक्कम, वडवली पंचायत समिती गणातून शिवसेनेचे ज्ञानदेव पदरत, मोर्बा पंचायत समिती गणातून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे यांच्या पत्नी अलका केकाणे, गोरेगाव पंचायत समिती गणातून शिवसेनेचा स्वाती करकरे, लोणेरे पंचायत समिती गणातून शिवसेनेचे रवींद्र टेंबे हे उमेदवार विजयी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT