माणगाव : कमलाकर होवाळ
मुंबई–गोवा महामार्गासह दिघी–पुणे मार्गावरील अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील प्रस्तावित ट्रॉमा केअर सेंटरला पुन्हा एकदा लालफितीचा फटका बसला आहे. तब्बल सुमारे १५ कोटी रुपयांच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शासनाकडे सादर होऊन जवळपास दीड वर्षाचा कालावधी लोटला असतानाही प्रशासकीय मान्यतेचा अंतिम टप्पा अद्याप पूर्ण झालेला नाही.
तांत्रिक मान्यता मिळाल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय मान्यता अजूनही प्रतीक्षेत आहे. त्यामुळे महामार्गावर अपघात झाल्यानंतर ‘वेळ म्हणजे जीवन’ या वास्तवाशी झुंजणाऱ्या माणगावकरा समोर पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला आहे - ट्रॉमा केअर सेंटर कधी सुरू होणार?
माणगाव आणि दक्षिण रायगडसह कोकणातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून आश्वासनांच्या फेऱ्यात अडकला आहे. मुंबई–गोवा महामार्गावर सातत्याने होणारे अपघात, दिघी–पुणे मार्गावरील वाढती वाहतूक आणि गंभीर जखमींना तातडीच्या उपचारांसाठी पनवेल, मुंबई, पुणे अथवा अलिबागकडे हलविण्याची वेळ यामुळे माणगावमध्ये अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटरची गरज कधी नव्हे इतकी तीव्र झाली आहे. अपघातग्रस्तांसाठी सुरुवातीची काही मिनिटे किती निर्णायक असतात, हे आरोग्य व्यवस्थेतील प्रत्येक घटकाला माहीत असताना जीवन-मरणाशी संबंधित सुविधा उभारणीची प्रक्रिया मात्र वर्षानुवर्षे कागदोपत्रीच फिरत राहणे, हीच या व्यवस्थेची शोकांतिका ठरत आहे.
या प्रकल्पासाठी सुरुवातीला जागेचा प्रश्न आडवा आला. वडखळ नाका परिसरात जागा उपलब्ध न झाल्यानंतर सन २०२२ मध्ये माणगाव शहरातील उपजिल्हा रुग्णालय परिसरा लगतच्या जुन्या पंचायत समितीच्या गट क्रमांक ६८४ मधील ३४ गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली. वापरा अभावी जीर्ण झालेल्या जुन्या इमारती पाडून त्या ठिकाणी आधुनिक ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र जागेचा अडथळा दूर झाल्या नंतरही प्रकल्पाला गती मिळण्या ऐवजी अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय मान्यता अशा सरकारी प्रक्रियांच्या भोवऱ्यात तो अडकत गेला.
ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारत बांधकामा साठी तब्बल १४ कोटी ५१ लाख रुपयांची तांत्रिक मान्यता मिळाल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकते. परंतु बांधकाम विभाग, माणगाव यांच्याकडून तयार करण्यात आलेले अंदाजपत्रक शासना मार्फत मंत्रालयात गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित असल्याची माहिती आहे. त्यामुळे मंजुरी नंतरही प्रशासकीय मंजुरीचा ‘ब्रेक’ कायम असल्याने प्रकल्पाची गाडी पुढे सरकणार कधी, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
विशेष म्हणजे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भरतशेठ गोगावले, महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्या सारखे सत्तेतील प्रभावशाली दिग्गज नेते व लोकप्रतिनिधी जिल्ह्यात असताना माणगाव सारख्या महत्त्वाच्या भौगोलिक ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या ट्रॉमा केअर सेंटरच्या प्रस्तावाला मंत्रालयीन पातळीवर गती का मिळत नाही, हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे. या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे दावे आणि प्रत्यक्षात प्रशासकीय मान्यता रखडलेली असल्याचे वास्तव यातील विरोधाभास नागरिकांच्या संतापाला कारणीभूत ठरत आहे.
अपघात झाल्यानंतर जखमी व्यक्तीला रुग्णवाहिकेतून दूरवरच्या शहरात हलविण्यासाठी लागणारा वेळ अनेकदा निर्णायक ठरतो. अशा परिस्थितीत माणगावमध्येच अत्याधुनिक उपचाराची सुविधा उपलब्ध झाली, तर दक्षिण रायगडासह रत्नागिरीच्या खेड, दापोली, मंडणगड आणि परिसरातील नागरिकांनाही मोठा आधार मिळणार आहे. प्रस्तावित केंद्रात १० खाटांचे ‘लेव्हल-३’ ट्रॉमा केअर युनिट उभारण्याचे नियोजन असून गंभीर जखमींवर तातडीने उपचार व आवश्यक शस्त्रक्रिया करण्याची क्षमता निर्माण होणार आहे.
पालकमंत्री, मंत्री आणि खासदार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पासाठी मंत्रालयीन पातळीवर नेमका किती पाठपुरावा केला, प्रस्ताव कोणत्या टेबलवर प्रलंबित आहे आणि प्रशासकीय मान्यता देण्यास नेमका विलंब कशामुळे होत आहे, याचे स्पष्ट उत्तर जनतेसमोर ठेवण्याची वेळ आली आहे.
माणगावच्या ट्रॉमा केअर सेंटरकडे आज संपूर्ण दक्षिण रायगडचे लक्ष लागले आहे. तांत्रिक मान्यतेनंतर प्रशासकीय मान्यतेची शेवटची पायरी पार करून प्रत्यक्ष बांधकाम कधी सुरू होते, यावर या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे. महामार्गा वरचा पुढचा अपघात कोणाच्या घराचा दिवा विझवेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे आणखी एखाद्या दुर्घटनेनंतर प्रशासन जागे होण्याची वाट न पाहता, आजच निर्णय घ्या आणि माणगावचा ट्रॉमा केअर सेंटरचा रखडलेला प्रवास प्रत्यक्ष कामाच्या दिशेने वळवा, अशीच नागरिकांची अपेक्षा आहे.