Stray Dogs Mangaon file photo
रायगड

Stray Dogs Mangaon: माणगावात भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव; नागरिक, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

प्रवासी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

माणगाव: माणगाव शहरात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या श्वानांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बसस्थानक परिसर, बाजारपेठ, शाळांच्या आसपासचे रस्ते, उपनगरातील वसाहती तसेच महामार्गालगतच्या भागात श्वानांचे टोळके मुक्तपणे फिरताना दिसत आहेत.

त्यामुळे प्रवासी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या सुमारास या श्वानांचा त्रास अधिक जाणवत असून अनेकदा दुचाकीस्वारांच्या मागे धावत भुंकणे, अचानक रस्त्यात येणे, वाहनांसमोर आडवे जाणे अशा घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील कचराकुंड्या, उघड्यावर टाकला जाणारा अन्नकचरा आणि वाढती अस्वच्छता यामुळे भटक्या श्वानांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी श्वानांचे टोळके एकत्र बसलेले दिसतात.

एखादा प्रवासी किंवा विद्यार्थी एकटा जात असताना हे श्वान अचानक आक्रमक होतात. त्यामुळे अनेकांनी रात्री घराबाहेर पडणे टाळण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील एका लहान मुलावर श्वानाने झडप घालून चावा घेतल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण अधिक गडद झाले आहे.

शाळेत जाणारी मुले, शिकवणीसाठी बाहेर पडणारे विद्यार्थी आणि सकाळी फिरण्यासाठी जाणारे ज्येष्ठ नागरिक यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. बसस्थानक परिसरात परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

रात्री उशिरा गावी परतणाऱ्या प्रवाशांना श्वानांच्या टोळक्यांचा सामना करावा लागत आहे. काही वेळा बसमधून उतरलेल्या प्रवाशांच्या हातातील पिशव्या किंवा खाद्यपदार्थ पाहून श्वान त्यांच्या मागे धावत असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे महिलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दुचाकीस्वारांसाठी हा प्रश्न अधिक धोकादायक ठरत आहे. अनेकदा रस्त्यावर धावत येणाऱ्या श्वानांमुळे वाहनचालकांचे संतुलन बिघडते. अचानक ब्रेक मारावे लागल्याने अपघात होण्याच्या घटना वाढत असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT