Raigad Ganeshotsav Traffic pudhari photo
रायगड

Raigad Ganeshotsav Traffic : महामार्गावर वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलिसांचा ‘वॉच’

आगामी गणेशोत्सवासाठी माणगाव पोलीस ‘अलर्ट’; रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू

पुढारी वृत्तसेवा

माणगाव : कमलाकर होवाळ

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे निर्माण होणारी संभाव्य वाहतूककोंडी टाळण्यासाठी माणगाव पोलीस प्रशासनाने आता पासूनच कंबर कसली आहे.

मुंबई-गोवा महामार्गा वरील माणगाव बाजारपेठ ही दरवर्षी वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू ठरत असल्याने यंदा तब्बल बारा दिवस आधीच पोलिसांनी विशेष उपाय योजनांना सुरुवात केली आहे. बाजारपेठेत पायी गस्त घालत बेकायदा पार्किंग करणाऱ्या व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या सुमारे ५७ वाहन चालकावर मोटार वाहन कायदा कलम १२२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाला अवघे बारा दिवस उरले असताना पोलीस ‘अलर्ट’ मोडवर दिसत आहेत. यासाठी माणगाव पोलिस व वाहतूक शाखा पोलिसांनी बाजारपेठेत पायी गस्त घालत महामार्गा लगत उभ्या केलेल्या मोटरसायकल, फोर व्हीलर व विविध वाहन चालक मालकावर कारवाईचा बडगा उचलल्याने वाहन चालकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. यात कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे सांगत नागरिक, प्रवासी, वाहन चालक आणि व्यापारी यांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आव्हान माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांनी केले.

मुंबई, सुरत, ठाणे, पुणे यांसह राज्यातील विविध भागांतून कोकण आणि तळकोकणात गणेशोत्सवा साठी मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात. गणेशोत्सवाच्या काळात वाहनांची संख्या नेहमीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढते. त्यातच माणगाव बाजारपेठेत तालुक्यातील नागरिकांची खरेदीसाठी होणारी गर्दी, रिक्षा वाहतूक, व्यापारी व ग्राहकांची वाहने आणि महामार्गावरील वाढलेली वाहतूक यामुळे कोंडीची समस्या अधिक गंभीर बनते.

माणगाव तसेच इंदापूर बाजारपेठेला बायपास उपलब्ध व्हावा, यासाठीची कामे वर्षानुवर्षे रखडलेली आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड व लांब पल्ल्याची वाहतूक थेट बाजार पेठेतूनच मार्गक्रमण करते. गणेशोत्सव काळात कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढल्याने वाहतुकीच्या रांगा कित्येक किलोमीटर पर्यंत लागण्याची परिस्थिती दरवर्षी निर्माण होते. याचा सर्वाधिक फटका गणेशभक्त, स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांना सहन करावा लागतो. '

यंदा १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्याने त्यापूर्वीच कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे माणगाव बाजारपेठेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संभाव्य वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी माणगाव पोलीस ठाण्याने विशेष नियोजन सुरू केले आहे. बाजार पेठेतील वाहन चालक, रिक्षाचालक, दुकानदार व व्यापाऱ्यांना रस्त्यालगत वाहने उभी न करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.

वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. या सोबतच गणेश भक्तांच्या वाहनांना वाहतूक कोंडीत अडकावे लागू नये, यासाठी संभाव्य पर्यायी मार्गांची पाहणी करून वाहतूक वळविण्याच्या दृष्टीनेही पोलीस प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.

दरम्यान, १ सप्टेंबर पासून सायंकाळी माणगाव पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी संयुक्तपणे माणगाव बाजार पेठेत पायी पेट्रोलिंग दररोज संध्याकाळी केले. मुंबई-गोवा महामार्गालगत उभी केलेली दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहने तपासण्यात आली. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या आणि नियमबाह्य पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी केवळ कारवाई न करता वाहनचालक आणि संबंधित दुकानदारांना वाहने कुठे व कशा पद्धतीने उभी करावीत, याबाबत समज देत वाहतुकीला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

पोलिसांच्या पायी गस्तीमध्ये मुंबई-गोवा महामार्गासह सतत वर्दळ असलेला कचेरी मार्ग, माणगाव-पुणे-निजामपूर मार्ग, माणगाव-मोरबा मार्ग तसेच माणगाव बसस्थानक परिसराचा समावेश होता.

गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक असून या काळात लाखो गणेशभक्त कोकणाकडे मार्गस्थ होतात. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवणे ही केवळ पोलीस प्रशासनाची जबाबदारी नसून वाहनचालक, व्यापारी, रिक्षाचालक आणि नागरिकांनीही नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक आहे. गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि माणगाव बाजार पेठेतील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी पोलिसां कडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. वाहन चालक व नागरिकांनी आपली वाहने रस्त्याला अडथळा निर्माण होईल अशी उभी करू नयेत. रस्त्यालगत बेकायदा पार्किंग करू नयेत तसेच पोलिसांना सहकार्य करावे.
मारुती आंधळे, पोलीस निरीक्षक, माणगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT