नाते ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने चार ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचा टप्पा गाठला आहे. आज आपला देश प्रगती करत असताना देशाच्या प्रगतीचा पाया रचण्यात ज्यांनी योगदान दिले त्यांची आठवण ठेवणे आपलं कर्तव्य आहे. स्वतंत्र भारताचे तिसरे अर्थमंत्री आणि भारतीय रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर चिंतामण द्वारकानाथ देशमुख यांचे मूळ गाव महाड तालुक्यात असून, सध्या त्यांच्या घराची अवस्था जीर्ण झाल्याने या घराची पुनर्बांधणी करून या घराचे सी. डी. देशमुख यांच्या स्मारकात रूपांतर करण्यात यावे आणि त्यासाठी 10 कोटी रुपये इतका निधी मंजूर करून द्यावा अशी मागणी मंत्री भरत गोगावले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सी. डी. देशमुख यांनी देशासाठी दिलेले योगदान लक्षात घेता भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित देखील केले आहे. मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या पत्रात मंत्री गोगावले यांनी म्हटले आहे की, ‘अर्थतज्ज्ञ सी डी देशमुख यांचे जन्मगाव मौजे नाते हे माझ्या महाड मतदार संघामध्ये असून, देशमुख यांचे देशासाठी विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यातही मोलाचे योगदान आहे. सद्यस्थितीमध्ये अर्थतज्ज्ञ डॉ. चिंतामण देशमुख यांचे मुळ गांव नाते येथील वास्तु अत्यंत जीर्ण झाली असल्याने सदर वास्तुची नव्याने उभारणी करून त्याचे स्मारकात रुपांतर करणे आवश्यक आहे. तरी, डॉ. चिंतामण देशमुख यांच्या नाते येथील वास्तुच्या ठिकाणी भव्य स्मारक उभारणेसाठी रक्कम रूपये 10 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात यावा. ही विनंती.’ अशी मागणी गोगावले यांनी पत्राद्वारे केली आहे.
डॉ. सी. डी. देशमुख यांनी देशाचे तिसरे अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, त्यांनी रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. देशमुख यांना ब्रिटिश सरकारने रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्त केले. सीडी देशमुख यांनी 11 ऑगस्ट 1943 ते 30 जून 1949 पर्यंत हे पद भूषवले. देशाच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पद भूषवणारे ते पहिले भारतीय होते. त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे ब्रिटिश राजवटीने त्यांना सर ही पदवी बहाल केली.
अशा या महान व्यक्तीची ओळख संपूर्ण देशाला व्हावी यासाठी त्यांच्या जीर्ण घराच्या वास्तूची पुनर्बांधणी करून त्याचे स्मारकात रूपांतर करणे गरजेचे आहे. त्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्याची मागणी मंत्री गोगावले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.