रायगडातील महिला बचतगटांमुळे सक्षम  pudhari photo
रायगड

Mahila Bachat Gat | रायगडातील महिला बचतगटांमुळे सक्षम

गणेश सोनवणे

रायगड : ग्रामीण परिसरातील महिला आता स्वयं सहायता गटाच्या माध्यमातून स्वत:चे सक्षमीकरण करत परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकताना दिसत आहेत. रायगड जिल्ह्यात 20 हजार 479 महिला बचतगट कार्यरत असून, सन 2023-24 या आर्थिक वर्षात फिरता निधी, जोखीम प्रवणता निधी, स्टार्टअप निधी, व्यवसायासाठी विविध बँकांकडून कर्ज असा एकूण 296 कोटी 34 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी दिली आहे.

बचतगटाच्या माध्यमातून महिला एकत्रित येऊन व्यवसाय करत असल्यामुळे व पारदर्शक सहकाराची प्रक्रिया असल्यामुळे स्त्रियांमध्ये मोठया प्रमाणात उद्योजकता निर्माण झाली आहे. अनेक प्रकारचे उद्योग या चळवळीतून जन्माला आले आहेत. या चळवळीने ग्रामीण भागातील प्रगतशील विशेषत: महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली आहे. जिल्ह्यात एकूण 20 हजार 479 बचतगटांनी नोंदणी असून या बचतगटांच्या माध्यमातून विशेषत: महिलांना आत्मविश्वास, आत्मनिर्भयता, आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व महिला स्वयंसहाय्यता बचतगटांच्या सक्षमीकरणाचे धोरण स्वीकारले आहे. यातून महिला आपल्या पायावर उभ्या राहत आहेत.

जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष रायगडतर्फे महिला बचतगटांची बांधणी व पुनर्बांधणी करणे, व्यवसाय प्रशिक्षण देणे, आर्थिकदृष्ट्या बचत गटांना सक्षम करणे हा प्रमुख उद्देश आहे. बचतगटांना फिरता निधीसह, व्यवसाय सुरू करण्यासाठी बँका कर्ज उपलब्ध करून देत आहेत. यामुळे बचतगटातील महिला विविध व्यवसाय करून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत.
डॉ . भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड.

यशोभरारी महिलांची...किमया बचतगटांची...दैनिक पुढारीचा आगळा उपक्रम

रायगड जिल्ह्यातील महिला बचतगटातील महिला सदस्याचे कार्य समाजापूढे आणण्याकरिता तसेच त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याकरिता दैनिक पुढारीच्या माध्यमातून यशोभरारी महिलांची...किमया सारी बचतगटांची, या आगळ्या उपक्रमाचे आयोजन जिल्ह्यात करण्यात आले आहे. या सदरात महिला बचत गटांची माहिती देण्यात येत आहे. या उपक्रमाच जिल्ह्यातील बचत गटांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. दरम्यान दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध होणार्‍या यशोभरारी महिलांची...किमया सारी बचतगटांची या सदराच्या 50 कात्रणांची वही सादर करणार्‍या महिला सदस्यांना पैठणीसह विविध गृहोपयोगी वस्तू जिंकण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे.

बचतगटांना कोट्यवधींचा निधी

रायगड जिल्ह्यात 20 हजार 479 महिला बचतगट कार्यरत असून, त्यापैकी 14 हजार 30 गटांना फिरत्या निधीच्या स्वरूपामध्ये 10 हजार ते 30 हजार रुपयांपर्यंत निधी देण्यात आला आहे. याशिवाय 82 बचतगटांना 1 कोटी 24 लाख जोखीम प्रवणता निधी, 6 हजार 297 समूहांना व्यवसायासाठी 247 कोटी 92 लाख इतके कर्ज विविध बँकांकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे.

जिल्ह्यात एकूण 930 ग्रामसंघांची स्थापना

रायगड जिल्ह्यात 20 हजार 479 बचतगट नोंदणीकृत असून, अनेक बचतगट एकत्र येऊन ग्रामसंघ स्थापन करण्यात येत आहे. असे जिल्ह्यात एकूण 930 ग्रामसंघ स्थापन करण्यात आले आहेत. ज्या बचतगटांनी एकत्रित येऊन ग्रामसंघ स्थापन केला नाही. अशा गटांचे ग्रामसंघ स्थापन करण्याची प्रक्रिया हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जिल्हा परिषद गट निहाय प्रभागसंघ स्थापन करण्यात येत असून जिल्ह्यात 59 प्रभागसंघ स्थापन करण्यात आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT