Women Farmer Certificate Pudhari
रायगड

Women Farmer Certificate: सक्षमीकरणासाठी महिला शेतकऱ्यांना मिळणार अधिकृत ओळख

रायगडमध्ये २ ऑक्टोबरच्या ग्रामसभेत प्रमाणपत्रांचे वाटप; विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविणे होणार सोपे

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग: महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी अधिनियम, २०२६” जाहीर केला असून, शेती क्षेत्रामध्ये महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेता महिला शेतकऱ्यांना अधिकृत मान्यता देणे, त्यांचे सक्षमीकरण करणे तसेच त्यांना विविध शासकीय योजना व उपक्रमांचा लाभ मिळवून देणे या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण अधिनियम जाहीर करण्यात आला आहे.

शेतीच्या भविष्यातील वाढीसाठी व शाश्वततेसाठी, बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत अन्नसुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तसेच महिला शेतकरी व त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी महिला शेतकऱ्यांना मान्यता देणे व त्यांचे सक्षमीकरण करणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महिला शेतकऱ्यांना त्यांच्या कृषीविषयक कार्याची अधिकृत ओळख मिळावी यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या अधिनियमांतर्गत केवळ पीक उत्पादन करणाऱ्या महिलांचाच समावेश नसून, शेती व कृषीपूरक व्यवसायांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असलेल्या महिलांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पिकांची लागवड, बीज उत्पादन, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, पशुपालन, मधमाशीपालन, चारा लागवड, मत्स्यव्यवसाय, जलीय संवर्धन, रेशीम उत्पादन, गांडूळ खत निर्मिती, फलोत्पादन, पुष्पोत्पादन, अळंबी लागवड, कृषी वर्गीकरण, चराईसाठी किंवा इतर कृषी उपयोगासाठी जमिनीचा वापर, स्वयंरोजगारातून केली जाणारी कंपोस्ट खत निर्मिती तसेच इतर कोणतेही कृषीविषयक कार्य यांचा समावेश आहे.

तसेच कुळवहीवाटीने लागवड, बटाई अथवा स्थलांतरित शेतीसह इतर प्रकारची लागवड, मालकी हक्क किंवा फलोपभोग हक्कांच्या आधारे गौण वनोत्पादन अथवा इमारती लाकूड नसलेले वनउत्पादन गोळा करणे, त्याचा वापर करणे किंवा विक्री करणे अशा कार्यांमध्ये सहभागी असलेल्या महिलांनाही महिला शेतकरी म्हणून मान्यता मिळणार आहे. सदर कार्ये मोबदल्यासाठी केली जात असोत किंवा विनामोबदला केली जात असोत, अशा महिला शेतकऱ्यांना या अधिनियमांतर्गत अधिकृत ओळख मिळणार आहे.

ऑनलाईन नोंदणी करावी लागणार

येत्या २ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित ग्रामसभांमध्ये पात्र महिला शेतकऱ्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी महिला शेतकऱ्यांनी आपली ऑनलाइन नोंदणी वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.

अलिबाग तालुका कृषी अधिकारी तन्मय भगत यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२६ हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. कृषी-अन्न व्यवस्थेमध्ये उत्पादनापासून ते बाजारपेठेतील व्यवहारांपर्यंत महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महिलांचा शेती व कृषीपूरक व्यवसायांमध्ये असलेला सहभाग हा कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT