Fishing Ban Pudhari
रायगड

Fishing Ban: 1 जूनपासून समुद्रात मासेमारीला ‌‘ब्रेक‌’; 61 दिवस यंत्रचलित नौकांवर बंदी

नियमभंग केल्यास जप्तीची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग: राज्यातील सागरी मत्स्यसंपत्तीचे संवर्धन आणि मासळीच्या प्रजनन काळाचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने यंदाही पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अन्वये 1 जून ते 31 जुलै 2026 या कालावधीत राज्याच्या क्षेत्रीय सागरी जलधी क्षेत्रात यंत्रचलित आणि यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सलग 61 दिवस लागू

राहणाऱ्या या बंदीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) सा.वि. कुवेसकर यांनी केले आहे.

पावसाळ्यात मासळीच्या विविध प्रजातींचा प्रजनन काळ सुरू असतो. या काळात मोठ्या प्रमाणावर यांत्रिक पद्धतीने मासेमारी झाल्यास मत्स्यसंपत्तीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या सागरी हद्दीत मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. ही बंदी केवळ यंत्रचलित आणि यांत्रिक नौकांनाच लागू राहणार असून पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचालित नौकांना त्यातून सूट देण्यात आली आहे.

1 जूनपूर्वी बंदरात परत या

समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यंत्रचलित आणि यांत्रिक नौकांनी 1 जून 2026 पूर्वी संबंधित मासेमारी बंदरात परतणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच बंदी कालावधीत म्हणजेच 31 जुलैपर्यंत अशा नौकांना समुद्रात मासेमारीसाठी जाता येणार नाही. बंदी काळात राज्याच्या सागरी क्षेत्रात मासेमारी नौकांच्या अवागमनावरही निर्बंध राहणार आहेत.

12 सागरी मैलांपर्यंत बंदी लागू

राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात म्हणजे किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. या क्षेत्रात कोणतीही यंत्रचलित किंवा यांत्रिक नौका मासेमारी करताना आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, 12 सागरी मैलांच्या पुढे खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौकांसाठी केंद्र शासनाचे स्वतंत्र धोरण आणि मार्गदर्शक सूचना लागू राहतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT