पनवेल : महाराष्ट्रातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा तसेच अमली पदार्थांची विक्री वाढत असल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. नियमांनुसार शैक्षणिक संस्थेच्या 100 मीटर परिसरात अशा पदार्थांची विक्री संपूर्णपणे बंदीस्त आहे. मात्र, अनेक ठिकाणी टपऱ्या आणि स्टॉल्सद्वारे या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले असून आ. प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा विक्री तात्काळ बंद करावी अशी मागणी करतानाच विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
ताराकिंत प्रश्नाद्वारे गुटखा व अंमली पदार्थ विक्रीचा गंभीर प्रश्न आ. प्रशांत ठाकूर यांनी दाखल केला होता. या प्रश्नाच्या अनुषंगाने विधिमंडळाच्या सभागृहात आ. प्रशांत ठाकूर यांनी सदरचा विषय मांडत शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले. महाराष्ट्रात शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा त्याचबरोबरीने अमली पदार्थांची विक्री वाढत असल्याची गंभीर तक्रार पुढे आली आहे.
शासनाच्या नियमांनुसार शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अशा पदार्थांची विक्री पूर्णपणे बंदीस्त आहे. तरीही अनेक ठिकाणी टपऱ्या आणि स्टॉल्स निर्बंधांचा भंग करत सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणले आहे. या प्रश्नाच्या अनुषंगाने लेखी उत्तरात शाळा महाविद्यालय 100 मी.परिसरामध्ये गुटखा तंबाखू सिगारेट विक्री करणाऱ्या टपरी, जनरल स्टोअर्स, किराणा दुकान यांचे अतिक्रमण काढण्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यासोबत पोलीस ठाणे प्रभारी यांनी पत्रव्यवहार करावा आणि संयुक्त कारवाई पथक नियुक्त करण्यात आलेली आहेत, अशी माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.
मात्र जर अशी पथके नियुक्त करण्यात आली आहेत तर लोकप्रतिनिधींना त्याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे प्रत्यक्षरित्या हा आदेश झाला असेल तर त्याची अमंलबजावणी कधी होणार आणि असे पथक नियुक्त केले असेल तर त्याची माहिती अधिकार फलकाप्रमाणे शाळा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये लावण्याची आवश्यकता आहे आणि तक्रार केल्यानंतरही गुटखा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टपऱ्या दुकानांना हटवले जाणार नसेल तर त्या पथकाला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशीही मागणी आ. प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात बोलताना केली. आणि या सर्व बाबीतून गुटखा व अंमली पदार्थ विक्रीचा महत्वपूर्ण विषय राज्य शासन दरबारी मांडून शासनाचे लक्ष केंद्रित केले.
गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी उत्तर देताना सभागृहात सांगितले कि, गुटख्यावर बंदी असतानाही काही ठिकाणी अवैध विक्री होते. त्या संदर्भात पोलिसांनी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला आणि त्यानुसार गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार शाळा महाविद्यालयांच्या परिसरातील पोलीस प्रशासनाने या टपरी दुकाने उध्वस्त करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेला कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. त्याचबरोबर या संदर्भात लोकप्रतिनिधींना माहिती देण्याकरिता तातडीने त्यांच्या ठिकाणच्या पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांना निर्देश देऊन तशी माहिती देण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना, गुटखा विक्रीवर कडक कारवाई झाली पाहिजे त्यासाठी निर्देश दिले असल्याचे सांगून त्या अनुषंगाने कारवाई करण्यासंदर्भात कायद्यात काही बदल करावे लागले तरी ते केले जातील, असे आश्वासित केले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीची उपाययोजना करण्याची मागणी नागरिक, सामाजिक संघटना आणि पालकांनी प्रशासनाकडे केली आहे. सदरच्या प्रश्नावर बोलताना आ. प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले कि, गुटखा आणि अंमली पदार्थाची विक्री विद्यालयांच्या परिसरातील टपरी दुकानांवर सर्रासपणे होत असल्याची तक्रारी संपूर्ण महाराष्ट्रातून येत आहेत.