Maharashtra forts security Pudhari
रायगड

Maharashtra forts security: महाराष्ट्रातील चार ऐतिहासिक किल्ल्यांवर वाढणार सुरक्षा; सरकारचा १२.९३ कोटींचा निर्णय

प्रतापगड राजगड साल्हेर आणि खांदेरी किल्ल्यांवर ११ महिन्यांसाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक

पुढारी वृत्तसेवा

रायगड: युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या महाराष्ट्रातील प्रतापगड, राजगड, साल्हेर आणि रायगड जिल्ह्यातील खांदेरी या चार ऐतिहासिक किल्ल्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या किल्ल्यांच्या सुरक्षेसाठी ११ महिन्यांच्या कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षक तैनात केले जाणार असून, त्यासाठी १२ कोटी ९३ लाख ८६ हजार ७२० रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली आहे.

सुरक्षारक्षकांची नेमणूक आणि मनुष्यबळ

महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या (एमएसएससी) माध्यमातून ही सुरक्षा रक्षकांची व्यवस्था तैनीत केली जाणार आहे. चारही किल्ल्यांवर मिळून एकूण ७६ सुरक्षारक्षक आणि ४ सुरक्षा पर्यवेक्षक असे एकूण ८० कर्मचारी तैनात केले जातील. यामध्ये प्रत्येक किल्ल्यावर १९ सुरक्षारक्षक आणि १ पर्यवेक्षक अशा २० कर्मचाऱ्यांची तुकडी कार्यरत राहाणार आहे.

किल्ल्यांवर पोर्टेबल कॅबिनची सोय

सुरक्षारक्षकांच्या निवासासाठी आणि कामकाजासाठी ऐतिहासिक वास्तूंच्या पुरातत्वीय निकषांचे पालन करून पोर्टेबल कॅबिनची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुरक्षेचा मुख्य उद्देश ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे, गडांचे संरक्षण करणे आणि पर्यटकांकडून होणाऱ्या अनुचित प्रकारांना प्रतिबंध घालून किल्ल्याचे पावित्र्य अबाधीत राखणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.

कायमस्वरूपी सुरक्षेसाठी सहा महिन्यांत अहवाल

या किल्ल्यांवर भविष्यात कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उभारण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग(एएसआय), पीपीपी मॉडेल, सीएसआर अथवा इतर राज्यांमधील सुरक्षा धोरणांचा अभ्यास करण्याचे निर्देश पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाला देण्यात आले आहेत. या अभ्यासाचा सविस्तर अहवाल सहा महिन्यांच्या आत सरकारला सादर करावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT