रायगड: राज्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती असलेले १० तालुके आज राज्य शासनाने जाहिर केले असून, त्यांत सर्वाधिक ७ तालुके कोकणातील आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यात सर्वाधिक कर्जत, पेण, तळा आणि महाड हे चार तालुके , पालघर जिल्ह्यातील वाडा व विक्रमगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यांचा समावेश आहे.
राज्यातील उर्वरित तीन तालुक्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ, कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या तीन तालुक्यांचा समावेश आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने तातडीने पावले उचलली आहेत.
राज्यातील एकूण १० तालुक्यांमध्ये पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ उपसमितीच्या २७ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीनंतर मदत व पुनर्वसन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव विनीता वेद-सिंगल यांनी आज हे आदेश जारी केले आहेत.
रायगड जिल्ह्यातील कर्जत, पेण, तळा आणि महाड तालुक्यांवर सर्वाधिक प्रभाव असल्याचे या निमीत्ताने स्पष्ट झाले आहे तर पालघर जिल्ह्यातील वाडा व विक्रमगड या दोन तालुक्यांत देखील गंभीर परिस्थिती आहे.
कोकण महसूल विभागातील रायगड व पालघर जिल्ह्याला दुष्काळाची सर्वाधिक झळ बसल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनांना तातडीने तालुक्यांचे पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
प्रमुख ५ पिकांचे २०% सर्वेक्षण
शासनाच्या सूचनेनुसार या सर्व १० तालुक्यांमधील दुष्काळाची तीव्रता विचारात घेऊन केंद्र सरकारच्या निकषानुसार कार्यवाही केली जाणार आहे. यामध्ये संबंधित तालुक्यातील प्रमुख ५ पिकांचे २० टक्के सर्वेक्षण (Ground Truthing) करून त्याचा मंडळनिहाय (Circle-wise) अहवाल तातडीने शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.