नेरळ ः महालक्ष्मी एक्स्प्रेस प्रवासी रेल्वे मध्ये चार वर्षांच्या चिमुकल्याचा टॉयलेटच्या पॅनलमध्ये पाय अडकल्याची धक्कादायक घटना घडली. तर कर्जत व लोणावळा रेल्वे पोलीस व आरपीएफ प्रशासनाचे जवानांच्या सतर्कतेपणामुळे मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर कोल्हापूर रेल्वे स्थान अशी महालक्ष्मी एक्सप्रेस गाडी ही 4 फेब्रुवारी 2026 रोजी प्रवासादरम्यान मार्गस्त असताना कर्जत रेल्वे स्थानकात रात्रीचे साडेदहा वाजण्याच्या सुमारास आली असता, महालक्ष्मी एक्सप्रेस गाडीच्या एस-2 या डब्यातील टॉयलेटमध्ये एका सुमारे चार वर्षांच्या चिमुकल्याचा पाय हा टॉयलेटच्या पॅनलमध्ये अडकला असल्याच्या घटनेची माहिती ही रेल्वे जीआरपी व आरपीएफ यांना घटनेची माहिती मिळताच, कर्जत रेल्वे स्थानकावरील रेल्वे कर्मचारी व जीआरपी व आरपी जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित टॉयलेटचे पॅनल काढून मुलाचा पाय बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले.
मात्र पाय व्यवस्थित बाहेर निघत नसल्याने परिस्थिती गंभीर बनली असल्यामुळे कोणताही धोका न पत्करता कर्जत रेल्वे जीआरपी अंमलदार व आरपीएफ चे अंमलदार यांनी सदर चिमुकल्याला त्याचे पालक महेंद्र कदर यांना घेऊन पाय अडकलेल्या पॅनलसह हुसेन सागर एक्सप्रेसने लोणावळा येथे पाठविण्याचा निर्णय घेत, लोणावळा रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर लोणावळा येथील रेल्वे स्टाफने कटरच्या साहाय्याने टॉयलेटचे पॅनल कापून सदर चिमुकल्याचा पॅनलमध्ये अडकलेला पाय हा सुरक्षितरीत्या बाहेर काढला आहे.
सुदैवाने या संपूर्ण घटनेत मुलाला कोणतीही इजा झाली नसून, एका निष्पाप चिमुकल्याचे प्राण वाचल्याने, कर्जत रेल्वे जीआरपी व आरपीएफ जवानांनी दाखवलेल्या तत्परतेपणा बद्दल मुलाचे पालक व रेल्वे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. तर या घडलेल्या घटनेमुळे महालक्ष्मी एक्सप्रेस ही कर्जत रेल्वे स्थानकात सुमारे 1 तास 45 मिनिटे उभी होती. मात्र रेल्वे जीआरपी व आर पीएफ प्रशासनाच्या दक्षतेमुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता उलट परिस्थितीचे गांर्भिय पाहाता प्रवाशांकडून शांतता राखण्यात आली आहे.