माणगाव : बांधकाम ठेकेदाराचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी गवंडी कामगार जमिल मेहबुब शेख यास जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा महत्वपूर्ण निर्णय माणगाव सत्र न्यायालयाने दिला आहे.
या निर्णयामुळे तब्बल आठ वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाच्या घटनेला न्याय मिळाला आहे. सदर घटना 5 एप्रिल 2018 रोजी रात्री सुमारे 11.30 वाजता महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुंदरवाडी, ता. महाड येथील नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत घडली होती. या घटनेत बांधकाम ठेकेदार अन्सार बहादूर बेग यांचा खून झाला होता.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक आर. पी. शिंदे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी अति. जिल्हा व सत्र न्यायालय, माणगाव येथे झाली. सरकार पक्षाच्या वतीने अति. शासकीय अभियोक्ता जितेंद्र म्हात्रे यांनी युक्तिवाद केला. यावेळी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण न्याय निर्णय न्यायालयासमोर सादर करण्यात आले.
प्रकरणातील फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी व तपासी अधिकाऱ्यांच्या साक्षींना न्यायालयाने विशेष महत्त्व दिले. अखेर ता. 12 जानेवारी 2026 रोजी आरोपीस दोषी ठरविण्यात आले असून, ता. 14 जानेवारी 2026 रोजी शिक्षेवरील युक्तिवादा नंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांनी आरोपीस जन्मठेप व एक हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्याच्या यशस्वी कामकाजासाठी पैरवी अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, आरोपी जमिल मेहबुब शेख (वय 50, रा. कवठळी, ता. परळी वैजनाथ, जि. बीड) हा मयत अन्सार बेग यांच्याकडे गवंडी म्हणून रोजंदारीवर काम करत होता. कामासाठी त्याने मयताकडून 13 हजार रुपये आगाऊ रक्कम घेतली होती. आरोपीने गावाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली असता, आधी घेतलेल्या रकमेच्या बदल्यातील काम पूर्ण करूनच जाण्याचा आग्रह मयत बेग यांनी धरला. यावरून दोघांत वाद होऊन मारामारी झाली. या वादातून संतप्त झालेल्या आरोपीने जवळील मोठा दगड उचलून मयताच्या उजव्या कानाजवळ डोक्यात जोरदार मारून त्यांचा जागीच मृत्यू घडवून आणला.