Mahad ZP Election Results Pudhari
रायगड

Mahad ZP Election Results: महाडमध्ये शिवसेनेचा दणदणीत विजय; जिल्हा परिषदेत 5 पैकी 5 जागांवर भगवा!

मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीतही 9 जागांवर यश; 59 टक्के मतांसह महाडमध्ये वर्चस्व कायम

पुढारी वृत्तसेवा

महाड : श्रीकृष्ण बाळ

महाड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) यांनी विरोधकांना एकतर्फी धूळ चारत मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत यश संपादन केले.

जिल्हा परिषदेच्या 5 पैकी 5 तर पंचायत समितीच्या 10 पैकी 9 जागांवर विजय मिळवत शिवसेनेने एकूण मतांच्या सरासरी तब्बल 59 टक्के मते मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप युती असूनही ग्रामीण मतदारांनी शिवसेनेलाच स्पष्ट कौल दिल्याचे निकालातून दिसून आले.

गेल्या काही काळापासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून तटकरे आणि गोगावले यांच्यातील वादामुळे महायुतीतील प्रमुख पक्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होईल का याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. मात्र महाड नगरपरिषद निवडणुकीप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही राष्ट्रवादीभाजप युती कायम राहिली. नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने नगराध्यक्षपद मिळवले असले तरी नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादीभाजप युतीने 12 जागा जिंकल्या होत्या, तर

शिवसेनेला 8 जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर यंदाही युती शिवसेनेसमोर कडवे आव्हान उभे करेल, अशी चर्चा होती; मात्र ग्रामीण मतदारांनी ही सर्व समीकरणे फोल ठरवली. या निवडणुकीत एकूण 67.08 टक्के मतदान झाले. जिल्हा परिषदेच्या मतदानात 93 हजार 549 मतांपैकी शिवसेनेला 55 हजार 864 (59.71 टक्के), राष्ट्रवादीभाजप युतीला 27 हजार 532 (29.43 टक्के), ठाकरे गटाला 9 हजार 414 (10.06 टक्के) मते मिळाली, तर नोटाला 724 (0.77 टक्के) मते पडली.

पंचायत समितीच्या 10 जागांपैकी धामणे ही जागा शिवसेनेने बिनविरोध जिंकली. उर्वरित 9 गणांमध्ये 84 हजार 21 मतदान झाले. त्यापैकी शिवसेनेला 48 हजार 954 (58.26 टक्के), राष्ट्रवादी-भाजप युतीला 26 हजार 401 (31.42 टक्के), ठाकरे गटाला 6 हजार 103 (7.26 टक्के) मते मिळाली, तर नोटाला 1,403 (1.5 टक्के) मते पडली.

दोन्ही निवडणुकांचा सरासरी विचार करता शिवसेनेला 59 टक्के, राष्ट्रवादी-भाजप युतीला 30.42 टक्के, ठाकरे गटाला 8.66 टक्के, काँग्रेस व अन्य उमेदवारांना 0.8 टक्केतर नोटाला 1.13 टक्के मते मिळाल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, भाजपाचे आमदार तसेच येथील भूमिपुत्र असणारे प्रवीण दरेकर यांनी आगामी काळात महाड मतदारसंघातून भाजपाही भक्कम दावा करू शकेल, असे संकेत पूर्वी दिले होते. मात्र प्रत्यक्ष निकालात भाजपाने राष्ट्रवादीसोबत युती करीत ताकद लावूनही अपेक्षित मतांची भर घालता आली नसल्याचे चित्र समोर आल्याने सध्या तरी महाडमधील राजकीय समीकरणांमध्ये मंत्री भरत गोगावले यांचे वर्चस्व अबाधित राहिले असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

मतदारसंघावरील वर्चस्व पुन्हा अधोरेखित

निकाल जाहीर होताच शिवसेनेच्या बहुतांश उमेदवारांनी 1000 ते 5,000 मतांच्या फरकाने एकतर्फी विजय मिळवल्याचे चित्र दिसून आले. विकास गोगावले यांनी पाच हजारहून अधिक तर मनाली काळीकर यांनी सुमारे सहा हजार मतांनी विजय संपादन केला. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीत मंत्री भरत गोगावले यांनी आपला करिष्मा कायम ठेवत मतदारसंघावरील वर्चस्व पुन्हा अधोरेखित केल्याचे निकालातून स्पष्ट झाले. आगामी काळात काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका वगळता मोठी निवडणूक नसल्याने पुढील विधानसभेपर्यंत गोगावले यांच्या बालेकिल्ल्याला आव्हान देण्यासाठी विरोधक कोणती रणनीती आखणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT