महाड ः श्रीकृष्ण बाळ
मागील 2 डिसेंबर 2025 रोजी महाड नगरपरिषदेच्या मतदानावेळी केंद्र 2 शाळा क्रमांक 5च्या बाहेरील रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर 50 दिवसांपेक्षा जास्त काळ फरार असलेल्या शिवसेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावलेसह एकूण आठ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हनुमंत जगताप यांसह एकूण पाच जण मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये आज महाड पोलीसांना शरण आले. त्यांना महाड न्यायालयालयासमोर हजर केले असता महाड न्यायालयाचे न्यायाधीश यु.एम.जाधव यांनी सर्व आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुमारे 52 दिवसांपूर्वी झालेल्या या हाणामारीतील फरार आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. या बाबत गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढल्ो होते. परिणामी 24 तासाच्या आत दोन्ही बाजूकडील आरोपी आज महाड शहर पोलीस ठाण्यात पोलिसांना शरण आले.
शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास विकास गोगावले व त्यांच्या सोबतचे अन्य सात जण महाड शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांची गुन्ह्याबाबत चौकशी करुन, वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महाड न्यायालयामध्ये हजर करण्यात आले.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत हनुमंत जगताप व अन्य चार आरोपी दुपारी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाले. प्राथमिक चौकशीची कार्यवाही पूर्ण झाल्यावर वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. संध्याकाळी सव्वा सहाच्या दरम्यान त्यांना महाड शहर पोलीस ठाणे व त्यानंतर महाड न्यायालयामध्ये हजर करण्यात आले.
यावेळी दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद एकून उभय पक्षाच्या आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती सरकारी वकिल यांनी प्रसार माध्यमांना दिली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य युवक उपाध्यक्ष सुशांत जाभरे व त्यांच्या सहकाऱ्यां कडून विकास गोगावले व त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला केल्याची तक्रार विकास गोगावले यांची आहे.
या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशांत जाभरे यांच्या अगंरक्षकाकडे असलेले रिवॉलव्हर झालेल्या झटापटी ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले होते. यावेळी या ठिकाणी असलेल्या गाड्यांमधून हॉकी स्टिक व स्टंप असल्याचा आरोप विकास गोगावले यांनी करून याबाबत शासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशांत जाभरे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये आपल्या सह सहकाऱ्यांना झालेली मारहाण व अन्य घडामोडीचा तपशील दिला होता. महाड न्यायालयामध्ये दोन्ही बाजूंकडून करण्यात आलेल्या युक्तिवादा दरम्यान सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला युक्तिवाद ऐकून सह दिवाणी न्यायाधीश यु.एम जाधव यांनी दोन्ही बाजूकडील आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले.