महाड-विन्हेरे मार्गावर सततच्या अपघातांमुळे वाढता धोका pudhari photo
रायगड

Mahad Road Accident : महाड-विन्हेरे मार्गावर सततच्या अपघातांमुळे वाढता धोका

दुर्घटनांमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण; तातडीने उपाययोजना करावी- सोमनाथ ओझर्डे

पुढारी वृत्तसेवा

महाड : श्रीकृष्ण बाळ

महाड–विन्हेरे मार्गावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांच्या घटनांमुळे हा मार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रस्त्यावरील धोकादायक वळणे, अरुंद भाग, अपुरी वाहतूक सूचना, पावसाळ्यात निर्माण होणारे निसरडे रस्ते आणि वाढती वाहतूक यामुळे वाहनचालकांसमोर गंभीर आव्हाने निर्माण होत आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विन्हेरे विभागातील शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

चालू मोसमाच्या पावसाळ्यातील पहिल्याच काही दिवसात दोन ते तीन घटना एसटी गाडी घसरल्याच्या झाल्या असून या पार्श्वभूमीवर प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सरपंच ओझर्डे यांनी स्पष्ट केले की,विशेषतः पावसाळ्यात या मार्गावर दाट धुके, कमी दृश्यमानता आणि रस्त्यावर साचणारे पाणी यामुळे वाहन चालविणे धोकादायक ठरते. काही ठिकाणी तीव्र वळणे असूनही पुरेशा प्रमाणात इशारा फलक, परावर्तित चिन्हे किंवा वेगमर्यादेची सूचना नसल्याने अपघातांचा धोका अधिक वाढतो.

अनेक वाहनचालकांना रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडांची स्पष्ट कल्पना येत नसल्याने दुर्घटना घडत असल्याचेही सांगितले जात आहे. या मार्गावर दुचाकीस्वार, मालवाहू वाहने, एसटी बस आणि खासगी वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, काही वाहनचालकांकडून होणारा अतिवेग, बेदरकार ओव्हरटेक आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन हे देखील अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे.

त्यामुळे रस्त्यावरील त्रुटी दूर करण्याबरोबरच वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचीही गरज अधोरेखित होत आहे. स्थानिक नागरिकांनी या मार्गावर धोकादायक वळणांवर संरक्षक कठडे, परावर्तित रस्तेचिन्हे, चेतावणी फलक, रंबल स्ट्रिप्स, पुरेशी प्रकाशयोजना आणि पावसाळ्यापूर्वी नियमित देखभाल करण्याची मागणी केली आहे. तसेच वाहतूक पोलिसांनी नियमित गस्त वाढवून वेगमर्यादेचे पालन होत आहे की नाही, यावरही लक्ष ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

  • संबंधित यंत्रणांनी या मार्गावरील अपघातांची कारणमीमांसा करून कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. मानवी जीविताची हानी टाळण्यासाठी आणि प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी विन्हेरे मार्गावरील धोकादायक ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करून आवश्यक सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT