Mahad river desilting pudhari photo
रायगड

Mahad river desilting : सावित्री, गांधारी, काळ नद्यांतील गाळामुळे चिंता

तातडीने गाळ काढण्याची मागणी; दर पाच वर्षांनी महापूर येण्याचा महाडचा इतिहास

पुढारी वृत्तसेवा

महाड : महाड तालुक्यातील सावित्री, काळ आणि गांधारी नदी यांच्या नदीपात्रातील साचलेला गाळ तातडीने काढण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. महापूर 2021 च्या भीषण पार्श्वभूमीवर प्रशासनाने सलग तीन वर्षे गाळ काढण्याचे काम हाती घेतले होते; मात्र चालू वर्षी या कामाकडे होत असलेले दुर्लक्ष स्थानिक नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

मागील दोन दशकांमधील महाड शहर व परिसरात आलेल्या महापूराची माहिती घेता पाच वर्षाच्या कालांतराने महापूर येत असल्याचे दिसून आले होते सन 2021 चा भीषण महाप्रलय हा त्याचाच एक भाग होता चालू वर्ष 2026 असून पाच वर्षे पूर्ण होत असल्याने महाडकर नागरिकांमध्ये एका भीतीच्या वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

2021 मध्ये आलेल्या महापुरामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला होता. त्यामुळे नदीची वहनक्षमता कमी झाली आणि पावसाळ्यात पाणी वेगाने वाढून पूरस्थिती निर्माण झाली. महाड शहरासह परिसरातील गावांना मोठा फटका बसला होता. घरांचे, शेतीचे व व्यापारी आस्थापनांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. या अनुभवातून धडा घेत प्रशासनाने पुढील तीन वर्षांत गाळ काढण्याची मोहीम राबवली.

काही प्रमाणात नदीपात्र रुंद व खोल करण्यात यश आले, त्यामुळे पूरस्थिती आटोक्यात ठेवण्यास मदत झाली. मात्र स्थानिकांच्या मते अजूनही निम्म्याहून अधिक भागात गाळ काढण्याचे काम अपूर्ण आहे. विशेषतः उपनद्यांच्या संगमाजवळ व शहरालगतच्या भागात गाळ मोठ्या प्रमाणावर साचलेला असल्याचे दिसून येते. पावसाळा तोंडावर असताना या प्रलंबित कामामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नदीपात्र पूर्ण क्षमतेने स्वच्छ न केल्यास पुन्हा पूराचा धोका संभवतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

तज्ज्ञांच्या मते नदीपात्रातील गाळ नियमितपणे काढला गेला नाही तर पाण्याचा प्रवाह अडथळला जातो. त्यामुळे पाणी पात्राबाहेर साचण्याची शक्यता वाढते. शिवाय गाळ साचल्याने नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलतो आणि काठांची धूप वाढते. याचा थेट परिणाम शेती, पायाभूत सुविधा आणि मानवी वस्त्यांवर होतो.

नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

एकूणच, सावित्री आणि गांधारी नदीपात्रातील गाळ काढण्याचा प्रश्न हा केवळ विकासकामाचा मुद्दा नसून तो नागरिकांच्या सुरक्षिततेशी निगडित आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनाने तातडीने पावले उचलून उर्वरित काम पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याची जोरदार मागणी होत आहे.

  • स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि शेतकरी यांनी प्रशासनाकडे तातडीने सर्वेक्षण करून उर्वरित गाळ काढण्याची मागणी केली आहे. निधीची उपलब्धता, यंत्रसामग्रीची नेमणूक आणि कामाच्या गतीवर विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. तीन वर्षे सातत्याने केलेल्या प्रयत्नांनंतर चालू वर्षी काम ठप्प राहिल्यास पूर्वीचा सर्व परिश्रम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT