महाड : श्रीकृष्ण द बाळ
महाड परिसरातील सावित्री, गांधारी आणि काळ या प्रमुख नद्यांच्या पात्रातील गाळ काढण्याच्या कामातील अडसर अखेर दूर झाला असून, आगामी आठ दिवसांत प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात होणार आहे. यामुळे पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यास मदत होण्याबरोबरच जलसाठा वाढण्यासही मोठा हातभार लागणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सन 2021 मध्ये महाडमध्ये आलेल्या महाप्रलयानंतर शासनाने युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर नदीपात्रातील गाळ काढणे, नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण, तसेच छोट्या ओढे व नाल्यांची स्वच्छता या कामांना प्राधान्य देण्यात आले. गेल्या चार वर्षांत या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम महाडकरांनी अनुभवले असून, पावसाळ्यातील पाण्याचा निचरा सुलभ होण्यास मदत झाली आहे.
सावित्री, गांधारी आणि काळ नदींसह परिसरातील लहान ओढे व नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली होती. या कामांमुळे नदीपात्र अधिक खोल व रुंद होत असून, पावसाचे पाणी साठवण्याची क्षमता वाढत आहे. परिणामी, पूराचा धोका कमी होण्यास आणि भूजलपातळी सुधारण्यास मदत होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, चालू वर्षासाठी सुमारे 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, हा निधी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या विशेष प्रयत्नातून उपलब्ध झाला आहे. या निधीतून नदी स्वच्छता व गाळ काढण्याची कामे अधिक गतीने आणि व्यापक स्तरावर राबवली जाणार आहेत.स्थानिक प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली असून, येत्या आठ दिवसांत प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे. या निर्णयामुळे महाड परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, भविष्यातील पूरस्थिती टाळण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
चालू वर्षी यासंदर्भात प्राप्त झालेल्या पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेकडून माहिती नुसार 70 पेक्षा जास्त जागांची निवड विभागाकडून करण्यात आली असून सुमारे 90 लाख क्युबिक मीटर गाळ काढण्याचा उद्दिष्ट चालू वर्षी ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
जलव्यवस्थापन अधिक सक्षम होणे गरजेचे
मागील तीन वर्षात झालेल्या कामाचा दृश्य परिणाम आडकर नागरिकांनी या दरम्यान झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीनंतर अनुभवला होता यामुळेच आगामी किमान पाच वर्षे सलग या तीनही नदीपात्रातील गाळ बाणकोट खाडीपर्यंत काढला गेल्यास आगामी 25 वर्षात महाड व परिसरातील नागरिकांना महाप्रलयाचा त्रास होणार नसल्याने शासनाकडून उशिरा का होईना मंजूर झालेल्या या कामाचे परिसरातील ग्रामस्थ व व्यापारी वर्गातून स्वागत होत आहे.
2021 च्या महाप्रलयानंतर महाडकर नागरिकांनी स्थापन केलेल्या पूर निवारण समितीने यासंदर्भात आपला सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवल्या असल्याचेच या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे शासकीय यंत्रणांच्या संदर्भातील असलेल्या कागदोपत्री विषयांच्या पूर्ततेकडे व नागरिकांच्या गरजा योग्य व्यासपीठावर मांडून महाडकरांची पुढील तीन दशकांची असलेली काळजी या निमित्ताने घेतले गेल्याचेच दिसून आल्याने महाडकर नागरिकांकडून समितीला धन्यवाद देण्यात येत आहेत.
एकूणच, शासनाच्या या निर्णयामुळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांमुळे महाड परिसरातील जलव्यवस्थापन अधिक सक्षम होण्याची अपेक्षा असून, पर्यावरणीय संतुलन राखण्यासही मदत होणार आहे.