रघुनाथ भागवत
खाडीपट्टा: खाडीपट्टयाला ऐतिहासिक महाड शहराशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रावढळ पुलाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालला आहे. सध्याला जुन्या रावढळ पुलावरून जैसे थे वाहतूक सुरू आहे, मात्र नवीन पुलाचे काम कधी होणार? असा थेट प्रश्न नागरिक करत आहेत.
नवीन पुलाचे काम अतिशय संथगतीने सुरु असून, ते गेली ७ महिन्यांपेक्षा आधी सुरु आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होईल असे आश्वासन राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र हे आश्वासन केवळ आश्वासनच राहिले आहे.
त्यानंतर पावसाळ्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण केले जाईल असे देखील आश्वासन दिले होते मात्र ते देखील हवेतच उडून गेले. आजतागायत सदर पुलाचे काम पूर्णतः अपूर्ण आहे. त्याचबरोबर या मार्गावरील म्हाप्रळ ते महाडच्या दरम्यान तेलंगे, सव गावादरम्यान मोरीचे काम अपुरे आहे. त्याचबरोबर कितीतरी किरकोळ कामे अपुरी आहेत.
रावढळ पुलाच्या कामामुळे रावढळ फाटा ते तुडील फाट्यापर्यंतच्या रस्त्याचे घोंगडे असेच राहिले आहे, त्यामुळे सदर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. अजून किती वर्षे हे असेच चालणार आहे, असा थेट सवाल खाडीपट्टयातील नागरिक करत आहेत.
गेल्या पावसाळ्यात हा जुना पूल चार दिवस पाण्याखाली गेल्याने ३० गावांचा संपर्क तुटला होता. आता पावसाळा संपला तरीही परिस्थिती जैसे थेच आहे. नवीन पुलाचे काम सुरू झाले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात गेल्या सात महिन्यांपासून या कामाला ब्रेक लागून आता काम सुरु झाल्याचे पाहायला मिळत असले तरी ते काम संथ गतीने सुरु आहे. ना कॉन्ट्रॅक्टर जागेवर आहे, ना कामगार. पुलाचे अर्धवट खोदलेले पिलर उभे केलेले असून आणि बाजूला टाकलेले मटेरियल तसेच पडून आहे.
पुलाच्या कामामुळे रावढळ फाटा ते तुडील फाटा या अवघ्या २०० मीटरच्या पट्टयातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे, उखडलेली खडी यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे वैतागवाडी झाली आहे. दुचाकीस्वार तर या रस्त्यावरून जाताना दररोज अपघाताच्या भीतीने प्रवास करतात. रात्रीच्या वेळी तर हा रस्ता आणखीनच धोकादायक बनतो.
प्रशासनाची बेफिकीरी
एकीकडे केंद्र सरकार राष्ट्रीय महामार्गाच्या नावाखाली करोडो रुपयांचा निधी देत आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र खाडीपट्टयातील मुख्य रस्त्याची ही अवस्था आहे. २०१९ साली हे काम पूर्ण होणे गरजेचे होते, परंतु आज देखील हे काम अपुरे आहे. अजून किती महिने लागतील या मार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी हे पाहणेच उरले आहे.
दरम्यान, जुन्या पुलावरून वाहतूक सुरू ठेवून प्रशासन केवळ तात्पुरती मलमपट्टी करत आहे, मात्र कायमस्वरूपी उपाय असलेला नवीन पूल कधी बांधला जाणार? आणि हा रावढळ ते तुडील रस्ता कधी सुस्थितीत होणार? याचे उत्तर देण्यास प्रशासन तयार नाही. देत आहे पण ते पुढाऱ्यांसारखे आश्वासन.