Agriculture News Pudhari
रायगड

Raigad farmers: खाडीपट्टयात थंडीची चाहूल, शेतकरी पुन्हा शेतात!

भात कापणी संपताच वाल, पावटा, तूर-मुगाच्या दुबार शेतीच्या कामांना वेग

पुढारी वृत्तसेवा

रघुनाथ भागवत

खाडीपट्टा: रायगड जिल्ह्याचे भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाडच्या खाडीपट्टयात आता हिवाळ्याची चाहूल लागली आहे. रविवारपासून सकाळी हलकीशी थंडी पडायला सुरुवात झाली असून, भात कापणी आटोपलेल्या शेतकऱ्यांनी आता दुबार शेतीकडे मोर्चा वळवला आहे.

दुष्काळाने होरपळूनही न खचता खाडीपट्टयातील शेतकरी राजा पुन्हा एकदा शेतात रमला आहे. भाताचे पीक हातातोंडाशी येऊनही पावसाने दगा दिल्याने मोठे नुकसान झाले. तरीही खचून न जाता शेतकऱ्यांनी आता वाल, पावटा, तूर, मूग आणि इतर कडधान्यासह भाजीपाल्याच्या लागवडीला प्राधान्य दिले आहे.

खाडीपट्टयातील कडधान्यामधील वाल रायगड जिल्ह्याच्या बाजाराबाजारात पोहोचतो. येथील वालाला विशेष मागणी असते. त्यामुळे भात कापणी होताच शेतकऱ्यांनी वालाच्या बियाण्याची जुळवाजुळव सुरू केली आहे. ओवळे, वलंग, गोमेंडी, चिंभावे, तेलंगे, आदिस्ते, सोनघर, रावढळ परिसरात सध्या शेतात नांगरट, वाफे तयार करण्याची लगबग दिसत आहे.

यंदा पेरणीच्या वेळी पाऊस लांबला. नंतर दुबार पेरणी केली, तेव्हाही पाऊस कमीच पडला. ऐन हंगामात पाऊस गायब झाल्याने निटसा कापणीच्या तोंडावर तर पाऊस गायबच झाला. ज्यामुळे भात पीक चांगले तयार झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुष्काळाचे महासंकट कोसळले.

सुरुवातीला राज्यभरात दुष्काळ जाहीर झाला, पण रायगडमध्ये फक्त श्रीवर्धन तालुक्याचाच समावेश होता. महाडच्या शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्यानंतर महाड तालुक्यातही दुष्काळ जाहीर झाला आणि पंचनाम्याचे आदेश निर्धारित झाले. मात्र तोपर्यंत कापणीचा हंगाम सुरू झाला होता.

सरकारच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांनी स्वबळावर कापणी उरकली आणि आता पुन्हा दुबार शेतीत उतरले आहेत. भात शेतीत झालेल्या नुकसानीची भरपाई दुबार शेतीतून होईल, अशी आशा आहे.

मात्र पुन्हा कोणतेही नैसर्गिक संकट उभे राहू नये, एवढीच अपेक्षा आहे.दिवाळीच्या पहिल्याच दिवशी थंडीने हजेरी लावल्याने खाडीपट्टयातील नागरिकांनीही स्वेटर बाहेर काढायला सुरुवात केली. दिवाळीचा आनंद आणि शेतात दुबार पिकाची लगबग, असे चित्र सध्या खाडीपट्टयात पाहायला मिळत आहे.

खाडीपट्टयातील वालाला केवळ रायगडच नाही, तर ठाणे, मुंबईच्या बाजारातही मोठी मागणी आहे. गेल्या वर्षी वालाला चांगला भाव मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी वालाचे क्षेत्र वाढवले आहे. एकरी ८ ते १० हजार रुपये खर्च येऊनही वालातून चांगले उत्पन्न मिळते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

त्यामुळे भातात झालेले नुकसान वालातून भरून काढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, दुबार शेतीच्या कामात यंदा महिला शेतकऱ्यांचा सहभाग लक्षणीय वाढला आहे. सकाळी थंडी असतानाही महिला शेतात वाफे तयार करणे, बियाणे टोकणे, पाणी देणे या कामात आघाडीवर आहेत. भात कापणीच्या काळात कुटुंबासह राबणाऱ्या या महिला आता पुन्हा दुबार शेतीसाठी सज्ज झाल्या आहेत. शेतकरी कुटुंबाची हीच जिद्द खाडीपट्टयाची खरी ओळख आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT