Mahad youth booked for offensive post
महाड : महाड शहरात मुस्लिम धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावणारा प्रकार शुक्रवारी (दि.12) समोर आला आहे. मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र ग्रंथ कुराणविषयी आक्षेपार्ह मजकूर मोबाईल स्टेटसवर ठेवून दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर शेकडो मुस्लिम बांधवांनी महाड शहर पोलीस ठाण्यावर धडक देत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. समुदायाच्या वतीने लेखी निवेदनही पोलिसांकडे सादर करण्यात आले. मयूर मोतीराम महाडिक (रा. करंजखोल, महाड) असे कारवाई करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दोन समाजांत तणाव वाढू नये व कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांनी योग्य ती दक्षता घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिस्थिती शांततापूर्णरीत्या नियंत्रणात आणली. या प्रकरणाचा पुढील तपास महाड शहर पोलीस ठाणे मार्फत सुरू आहे.