महाड : दोन डिसेंबर 2025 रोजी महाड नगरपरिषदेच्या मतदान केंद्र दोन शाळा क्रमांक पाच च्या बाहेरील रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारामारी आणि नंतर मागील 50 दिवसांपेक्षा जास्त काळ बेपत्ता असलेल्या शिवसेना कोर कमिटी सदस्य व मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले सह एकूण आठ तर राष्ट्रवादीच्या हनुमंत जगताप यांसह एकूण पाच जणांना आज महाड न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुमारे 52 दिवसापूर्वी झालेल्या या हाणामारी ची दखल संपूर्ण राज्यभरातील माध्यमाने घेतली होती काल उच्च न्यायालयाने यासंदर्भात व्यक्त केलेल्या कठोर ताशेऱ्यानंतर 24 तासाच्या आत दोन्ही बाजूकडील आरोपी आज महाड शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. प्राप्त झालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री उशिरा दोन्ही बाजूकडील आरोपी महाड परिसरात दाखल झाल्याची माहिती देण्यात आली होती आज सकाळी दहाच्या सुमारास विकास गोगावले व त्यांच्या अन्य सात जणांनी महाड शहर पोलीस ठाण्यात आपली हजेरी लावल्यानंतर त्यांना प्राथमिक गुन्ह्याबाबत असलेल्या चौकशी अंतिम वैद्यकीय तपासणीसाठी देण्यात आले व सायंकाळी सहाच्या सुमारास महाड न्यायालयामध्ये हजर करण्यात आले.
दुसरीकडे राष्ट्रवादीच्या हनुमंत जगताप व अन्य चार जणांना दुपारनंतर महाड मधील एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर करून तेथे प्राथमिक कार्यवाही पूर्ण झाल्यावर वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले व सव्वा सहाच्या दरम्यान त्यांना महाड शहर पोलीस ठाणे व त्यानंतर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. यावेळी दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली असून सुनावणी अंती ऍड सनी जाधव यांनी दोन्ही बाजूकडील आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली
दोन डिसेंबर 2025 रोजी नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रिया सुरू असताना शाळा क्रमांक पाच च्या बाहेरील मार्गावर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसैनिकांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य युवक उपाध्यक्ष सुशांत जाभरे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून विकास गोगावले व त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला केल्याची तक्रार विकास गोगावले यांनी केली होती.
दरम्यान सुशांत जाभरे यांच्या संरक्षकाकडे असलेल्या रिव्हॉल्वर झालेल्या झटापटी ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले होते. यावेळी या ठिकाणी असलेल्या गाड्यांमधून हॉकी स्टिक व स्टंप असल्याचा आरोप विकास गोगावले यांनी करून याबाबत शासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान सुशांत जाभरे यांनी देखील केलेल्या तक्रारीमध्ये आपल्या सह सहकाऱ्यांना झालेली मारहाण व अन्य घडामोडीचा तपशील दिला होता.
4 डिसेंबर पासून दोन्ही बाजूच्या प्रमुख आरोपी महाड बाहेर निघून गेल्याने त्यांच्या तपासासाठी पोलीस यंत्रणांनी विविध पद्धतीने शोध मोहीम सुरू केली होती. मागील 50 दिवसापेक्षा जास्त काळ या संदर्भात माणगाव कोर्ट व मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून झालेल्या दिरंगाई बद्दल तीव्र ना पसंती युक्त नाराजी व्यक्त करून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत असहाय्य आहेत का अशा कठोर शब्दात विचारणा केली होती.
तसेच आरोपींनी शुक्रवारी सकाळी 11 च्या आत पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करावे असे सुचविले होते. त्यानुसार आज सकाळी प्रथम विकास गोगावले यांसह उर्वरित सात व सायंकाळी उशिरा हनुमंत जगताप व उर्वरित चार जणांनी प्रथम एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्यानंतर वैद्यकीय तपासणी अंतिम महाड पोलीस ठाण्यात हजेरी लावली. महाड न्यायालयामध्ये दोन्ही बाजूंकडून करण्यात आलेल्या युक्तिवादा दरम्यान सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला युक्तिवाद ऐकून न्यायाधीश यु. एम. जाधव यांनी दोन्ही बाजूकडील आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले.
महाड सह संपूर्ण राज्यात गेल्या 50 दिवसापासून बहुचर्चित असलेल्या महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यानच्या या मतमोजणी दरम्यान झालेल्या मारहाणीची संपूर्ण राज्यात माध्यमांमधून घेतलेल्या दखलीच्या पार्श्वभूमीवर आज दोन्ही बाजूंवरील प्रमुख आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाल्याने व न्यायालयाने त्यांच्या संदर्भात निर्णय येईल घोषित केल्याने महाड सह रायगड जिल्ह्यात न्यायालयाच्या या निर्णयाबाबत जोरदार चर्चा सुरू असल्याचे ऐकावयास मिळाले.