महाड : महाड नगरपालिकेच्या 6 प्रभागांमध्ये परस्पर विरोधी उमेदवारांचा विजय झाल्याने या महत्त्वपूर्ण निवडणुकीमध्ये महाडकर नागरिकांनी राजकीय पक्षापेक्षा व्यक्तिसापेक्ष मतदान करून आपला निवडणूक कर्तव्याचा हक्क बजावल्याचे स्पष्ट चित्र पहावयास मिळत आहे.
ऐतिहासिक महाड नगर परिषदेच्या 21 मे रोजी झालेल्या मतमोजणी निकालानंतर जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक निकालानुसार एकूण 10 प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक 1, 5 व 8 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष युतीचे दोन्ही तर प्रभाग 10 मध्ये शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजय संपादन करण्यात यशस्वी झाले आहेत. उर्वरित 6 प्रभागांमध्ये परस्पर विरोधी उमेदवारांचा विजय झाल्याने या महत्त्वपूर्ण निवडणुकीमध्ये महाडकर नागरिकांनी राजकीय पक्षापेक्षा व्यक्तिसापेक्ष मतदान करून आपला निवडणूक कर्तव्याचा हक्क बजावल्याचे स्पष्ट चित्र पहावयास मिळत आहे .
या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या निर्णयानुसार प्रभाग 1 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपचे अनुक्रमे वैशाली रक्ते व रणजीत साळी, प्रभाग 5 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपचे हवा पानसरी व वजीर कोंडीवकर प्रभाग 8 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या अक्षया हेलेकर व सुमित पवार तर प्रभाग 10 मध्ये शिवसेनेच्या मीनल जाधव व दीपक चव्हाण यांचा विजय झाला आहे .
या उलट प्रभाग 2 मध्ये शिवसेनेच्या पालवी गोळे व राष्ट्रवादी भाजपचे महेश शेडगे प्रभाग 3 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या गीतांजली महाडिक तर शिवसेनेचे प्रमोद महाडिक, प्रभाग 4 मध्ये शिवसेनेच्या गायत्री कविस्कर व राष्ट्रवादी काँग्रेस भाजपचे हेमंत चांदलेकर, प्रभाग 6 मध्ये शिवसेनेच्या विद्या देसाई तर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीचे सुरज बामणे, प्रभाग 7 मध्ये शिवसेनेच्या पूजा गोविलकर, तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपचे संदीप जाधव, प्रभाग 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या दीशा शिंदे तर शिवसेनेचे निखिल शिंदे यांनी विजय संपादन करण्यात यश प्राप्त असून महाडकर नागरिकांनी प्रामुख्याने नगराध्यक्ष पदा सह प्रत्येक प्रभागातील उमेदवाराकडे पाहताना व्यक्ती सापेक्ष विचार करून बहुसंख्येने मतदान केल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्राधान्याने याच गोष्टीकडे लक्ष देण्यात येते. त्याचाच प्रत्येक पुन्हा एकदा महाड नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे पहावयास मिळाले. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये दोन अपक्ष तर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांनी प्राप्त केलेली मते या निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या निर्णयावर कारणीभूत करणारी ठरल्याचेही मत सर्वसामान्य जनता व्यक्त करीत आहे.
स्थानिक पातळीवरील मतदानामध्ये व्यक्ती केंद्रीत निवडणूक होत असते. आपल्या प्रभागात अधिक संपर्क ठेवणाऱ्या उमेदवारांना मतदारांचा पाठींबा अधिक मिळत असतो. त्यामुळे एकाच प्रभात पॅनल प्रमाणे मतदान न होता, वेगवेगळ्या उमेदवारांना होते.
स्थानिक राजकारणातही आता सर्वसामान्य मतदार आपल्या विचाराशी प्रामाणिक राहणाऱ्या उमेदवाराबाबत सतर्कतेने विचार करत असल्याचे दिसू झाले असून या निवडणूक निकालाने प्रमुख राजकीय पक्षांना आगामी निवडणुकीमध्ये उमेदवारांची निवड योग्य पद्धतीने करण्यावर भर द्यावा लागेल असे स्पष्ट संकेत प्राप्त झाले आहेत.