रायगड

महाड : मल्‍लक स्‍पेशालिटीतील दोन स्‍फोटांनी एमआयडीसी हादरली

निलेश पोतदार

महाड ; पुढारी वृत्‍तसेवा महाड औद्योगिक वसाहतीमधील मल्लक स्पेशालिटी प्लॉट क्रमांक सी 103 या ठिकाणी आज (बुधवार) सकाळी 11 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीच्या घटनेनंतर साडेअकरा वाजता आणि साडेबारा वाजता दोन स्फोट झाले. या स्‍फोटांनी कंपनीचा संपूर्ण परिसर हादरून गेला.

साडेअकरा वाजता झालेला पहिला स्‍फोट एवढा मोठा होता की, महाड शहराच्या नवे नगर भागापर्यंत त्याचे हादरे जाणविले. दरम्यान साडेबारा वाजता झालेल्या दुसऱ्या स्फोटाने कुसगाव मार्गावरील कंपन्यांच्या कारखान्याच्या काचा व पत्रे उडाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या ठिकाणचा विद्युत पुरवठा बंद झाल्याने कामगारांना सुरक्षितेच्या कारणास्तव बाहेर काढण्यात आल्याची माहिती परिसरातील नागरिकांकडून देण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता लागलेल्या आगीचे वृत्त समजताच एमआयडीसी फायर ब्रिगेडने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

या आगीचे वृत्त समजतात महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या वृत्तानुसार, या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. असे असले तरीही अधिक सविस्तर वृत्त काही वेळानंतरच प्राप्त होईल. गेल्या वर्षभरात महाड औद्योगिक वसाहतीमध्ये झालेल्या आगीच्या घटनांची संख्या पाहता औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या सुरक्षिततेची पुन्हा एकदा उच्च अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT