Mahad MIDC Water Pollution Pudhari
रायगड

Mahad MIDC Water Pollution: रासायनिक प्रदूषणाने टेमघर नाल्यात मृत माशांचा खच

महाड परिसरात प्रचंड दुर्गंधीचे साम्राज्य; नागरिक त्रस्त; कठोर कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

महाड: महाड एमआयडीसीतील टेमघर नाल्यात प्रदूषित पाणी मिसळल्याने असंख्य मासे, जलचर मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. नाल्यात मृत माशांचा अक्षरशः खच पडला असून, वाम, खवल, शिवडा, मळे, दांडणी यांसह विविध जातींच्या लहान-मोठ्या माशांचा यामध्ये समावेश आहे.

जिते गावच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरातील एका औद्योगिक आस्थापनाच्या शेजारील नाल्यातून पिवळसर रंगाचे प्रदूषित पाणी वाहत असून, याच ठिकाणापासून मासे मृत्युमुखी पडण्यास सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे.

मृत माशांचा हा खच टेमघर गावापासून थेट काळ नदीपर्यंत पसरला आहे. नाल्यात फेसाळयुक्त व लालसर रंगाचे रासायनिक पाणी वाहत असून, परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान, एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यावरील पुलाखालून देखील रासायनिक सांडपाणी बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले असून या ठिकाणी सांडपाणी वाहून नेणारी एखादी वाहिनी फुटली असावी, असा प्राथमिक अंदाज देखील वर्तविण्यात येत आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन संबंधित नाला तसेच काळ नदीच्या संगम परिसरातील पाण्याचे नमुने संकलित केले असून ते तपासणीसाठी पुढे पाठवले आहेत. टेमघर नाल्यात मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर असल्याने त्यांच्यासह अन्य जलचरांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.

वर्षानुवर्षे सुरू असलेला हा विषारी कारभार रोखणार तरी कोण? असा संतप्त सवाल आता परिसरातील ग्रामस्थ करत आहेत. या घटनेचा महाड शहर विकास मंच या महाडमधील सोशल मीडिया समूहानेही निषेध व्यक्त केला असून महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याकडे याबाबतीत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या नाल्यातील प्रदूषण हा नित्याचाच विषय बनला असल्याने वरचेवर होणाऱ्या या घटनेमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून निसर्गासह मानवी जीविताशी खेळणाऱ्या अशा दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांसह निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

टेमघर नाल्यात मोठ्या प्रमाणावर रासायनिक सांडपाणी मिसळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मासे मृत्युमुखी पडले आहेत. आम्ही सदर नाल्यातील पाण्याचे नमुने, त्याचप्रमाणे या नाल्याच्या काळ नदीपात्रातील संगमाजवळील नमुनेदेखील जमा केले असून, ते तपासणीसाठी पाठवले आहेत. सदर रासायनिक सांडपाण्याबाबत संपूर्ण परिसराचा तपास केला असता वरील डोंगराळ भागातूनच लालसर पाणी खाली येत असल्याचे व नाल्यात मिसळत असल्याचे दिसून येत आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हे सांडपाणी नाल्यांमध्ये मिसळण्याची शक्यता दिसून येत आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे
- दर्शन म्हात्रे, क्षेत्र अधिकारी, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT