श्रीकृष्ण बाळ
महाड: शनिवारी सायंकाळी उशिरा महाड औद्योगिक वसाहती मधील बी १४ या इंडो अमाईन्स कंपनीत झालेल्या वायू गळती मध्ये दोन कामगारांचा मृत्यू तर ६० जणांना वायूबाधा झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने (एमपीसीबी) तातडीने ही कंपनी बंद करण्याचे लेखी आदेश दिल्याची माहिती या मंडळाचे अधिकारी आर.बी. म्हात्रे यांनी दिली आहे.
दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या घटनेचे गांभीर्य ओळखून कारखाना बंद करण्याच्या दिलेल्या आदेशाचे महाड एमआयडीसी परिसरातील नागरिकांसह वसाहती मधील कामगार वर्गातून स्वागत केले जात आहे.
महाड औद्योगिक वसाहती मधील या अत्यंत गंभीर अशा वायू गळतीने कंपनी समोरील असणाऱ्या कारखान्यातील कामगारांना त्याची लागण होऊन ६० पेक्षा जास्त कामगार अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले होते.
यापैकी इंडो अमाईन्स कंपनीतील अमितकुमार राज व विरल कंपनीतील कल्पेश वांद्रे या दोघांचा मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने १६ ऑगस्ट रोजीच तातडीने ही कंपनी बंद करावी असे आदेश निर्गमित केल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली आहे.
या संदर्भात अधिक चौकशी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट करून, पुढील काळात या संदर्भात अधिक बाबी प्राप्त होतील असे सांगून या ठिकाणी कोणता गॅस वापरण्यात आला याबाबतची माहिती डिश यंत्रणे कडून प्राप्त होऊ शकेल असे सांगीतले.
दरम्यान शनिवारी घटना घडल्यानंतर रविवारी सकाळी महाड एमआयडीसी करता नियुक्त असलेले फॅक्टरी इन्स्पेक्टर आर.एस.तांबोळी यांनी या कंपनीला भेट देवून ,आपला अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करणार आहेत.
महाड औद्योगिक वसाहती मधील कारखानदारांना आपल्या उद्योगांमध्ये लागणाऱ्या संबंधित रसायनांची माहिती कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर २४ तास दर्शनी भागात लावण्याबाबतचे निर्देश यापूर्वीच मंडळाकडून देण्यात आले आहेत.मात्र आजही अनेक कारखान्यांकडून या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याची माहिती वसाहती मधील कामगार वर्गातून प्राप्त होत आहे.
मंडळाच्या आदेशाची पूर्तता न करणाऱ्या कारखान्या विरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळ काय कारवाई करणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या नेहमीच्या असलेल्या कारखान्यातील तपासणी बाबत अधिक जागरूकता व गंभीरतेने पाहण्याची आवश्यकता या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे.