महाड : चालू पावसाळी मोसमात 70 टक्के पावसाची नोंद झाली असताना सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने गेल्या दोन दिवसापासून महाडकरांना दुपारनंतर तुफान झोडपून काढले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे याचा थेट परिणाम बाजारपेठेतील व्यावसाय धारकांवर झाल्याचेही दिसून आले. दरम्यान या तुफानी पावसाने केवळ महाड शहरातच नव्हे तर महाडलगत राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या चांभार खिंड या गावाशी असलेल्या सर्विस रोडवर देखील नाल्यांच्या न केलेल्या कामांमुळे महामार्गावर जाणाऱ्या व या गावात जाणाऱ्या लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याचे संताप जनक चित्र पहावयास मिळाले.
दरम्यान महाड नगरपरिषद प्रशासनाने न केलेल्या नालेसफाईचा परदाफाश होऊन शहराच्या विविध भागांतील मुख्य बाजारपेठेसह परिवार शोरूम महावीर चिंतन एजन्सी तसेच चवदार तळे परिसरात रस्त्यांवरच पाणीच पाणी आल्याचे दृश्य महाडकरांना अनुभवास आले.
2021 नंतर नदीपात्रातील काढलेल्या गाळामुळे शहरात नदीचे पाणी शिरले नव्हते मात्र नगरपालिकेच्या या अकार्यक्षमतेमुळे नागरिकांना हा मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी व संताप जनक प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या परिवार शोरूम व परिसरात असलेल्या नाल्यांमधून पाणी बाहेर येऊन रस्त्यावर साचून नागरिकांना त्यामधून चालणे अशक्य झाल्याचे पहावयास मिळाले.
मार्गावरून जाणाऱ्या गाड्यांमुळे अंगावर उडणारे पाणी झेलत जाण्याचा देखील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. शहरालगत जाणाऱ्या राजकीय महामार्गाच्या चांभार खिंड गावाच्या हद्दीमध्ये देखील नाल्यांची कामे न करण्यात आल्याने या ठिकाणी एक ते दीड फूट पाणी रस्त्यावर साचून नागरिकांना त्यामधून जाण्याचा तसेच वाहन चालकांना गाडी नेताना मोठी कसरत करावी लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.
यासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गाकडे मागील वर्षीच या रस्त्यावर नाल्यांची कामे योग्य पद्धतीने करावीत अशी मागणी केली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचेच आजच्या आलेल्या या रस्त्यावरील एक ते दीड फूट पाण्याने स्पष्ट झाले आहे यासंदर्भात संबंधित राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी येथील महाडकर नागरिक व ग्रामस्थ मंडळींकडून करण्यात येत आहे.
चालू वर्षी नगर परिषदे कडून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात तांत्रिक अडचण आल्याचे कारण सांगितले गेले होते मात्र जून महिन्यामध्ये उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाकडून हे काम पूर्ण केले जाईल अशी सफाई देण्यात आली होती मात्र गेल्या दोन दिवसातील आलेल्या या परतीच्या तुफान पावसाने नगरपरिषद प्रशासनाने केलेले काम आता नागरिकांसमोर आले असून यामुळेच नागरिकांना आज पाण्यातूनच प्रवास करावा लागला व नदीपात्रातील पाण्याने नव्हे तर नाल्यातील पाण्याने रस्त्यावर पाणी आणायचा आनंद उपभोक्ता आला अशी मार्मिक टीकात्मक प्रतिक्रिया नागरिकांमधून तसेच विशेष करून महिला वर्गातून व्यक्त होत आहे.