

महाड ः महाडमध्ये 23 जुलैमध्ये सापडलेल्या अमली पदार्थाचे परराज्यातील धागेदोरे शोधून काढण्यात आले असून, महाड पोलिसांनी मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये मोठी कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.या कारवाईचे कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक संजय दराडे यांनी कौतुक केले आहे.
23 जुलै रोजी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामार्फत टाकण्यात आलेल्या छापा कारवाईमध्ये 89 कोटीचे अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता. या संदर्भात तपास अधिकारी जीवन माने यांनी कसब पणाला लावून गुन्ह्यात यापूर्वीच अटक असलेल्या चार आरोपींना विश्वासात घेतले. तपासात उघड केलेल्या माहितीची तांत्रिक विश्लेषण आधारित खातर जमा केली. त्यामधून सदर अमली पदार्थ हे मध्यप्रदेश, राजस्थान राज्याच्या सीमेवरील हथुनिया गावात राजस्थानमध्ये पाठविण्यात आल्याची उघड झाली.
आंतरराज्य संबंध उघड होताच वेगवान हालचाली करत वेगवेगळी पथके तयार करत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आवश्यक त्या मदतीसह या पथकास राजस्थान येथे रवाना करण्यात आले. त्यानुसार संबंधित पथकाने संशयित इसमाचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन माहिती घेतली असता संबंधित आरोपीने महाड येथील कारवाईची माहिती मिळताच स्वतःकडील मुद्देमाल 10 फूट खोल खड्डा खणून त्यामध्ये करून टाकला असल्याचे सांगितले.
कारवाई पथकाने जेसीबीच्या सहाय्याने खड्डा काढून सदर मुद्देमालाचे नमुने जप्त केले आहे. यामध्ये सिद्दिक फिरोज खान वय 28 रा.हातून ( राजस्थान) याला ताब्यात घेण्यात आले आहे. यासंदर्भात अँटिनोरकोटिक्स पथक अहमदाबाद गुजरात व हथुनिया पोलीस ठाणे जिल्हा प्रतापगड राजस्थान यांच्या स्थानिक पोलीस पथकाची विशेष मदत झाल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क अधिकार्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाई पथकामध्ये सपोनी जीवन माने यांसह पोसई सुशील काजरोळकर, इकबाल शेठ ,नारायण दराडे, शितल बंडगर यांचा समावेश होता.
परराज्यात जाऊन अमली पदार्थाचा साठा शोधून काढणार्या तपास पथकाच्या अतुल्य कामगिरी बाबत विशेष पोलीस निरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे यांनी कारवाई पथकाचे अभिनंदन केले आहे. या कारवाई पथकाला रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल ,अप्पर पोलीस अधीक्षक रायगड अभिजीत शिवथरे, व स्थानिक गुन्हे शाखा अलिबाग मिलिंद खोपडे पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.