Mahad Flood 2005 Pudhari
रायगड

Mahad Flood 2005: वीस वर्षांनंतरही जुईकरांना अतिवृष्टीत भरते धडकी; भूस्खलनात ९४ ग्रामस्थांचा झालेला मृत्यू

जुई पुनर्वसन जागा गावठाण करण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

रघुनाथ भागवत

खाडीपट्टा: २५ जुलै २००५ च्या काळरात्री महाड तालुक्यात आलेल्या जलप्रलयामुळे नागरिकांच्या व व्यापारी उद्योगाची कोट्यावधी रुपयांची हानी होत असतानाच तालुक्यातील अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या.

त्यामध्ये खाडीपट्टयातील जुई या ठिकाणी झालेल्या दुर्दैवी दरड कोसळण्याच्या घटनेमुळे ९४ जणांना प्राण गमवावे लागले होते. वीस वर्षानंतरही त्या काळरात्रीची जखम जुईकरांसाठी ओलीच आहे. आजही अतिवृष्टी झाल्यावर जुईकरांच्या पोटात गोळा येतो.

जुई येथे झालेल्या २००५ च्या दुर्घटनेनंतर तेथील बाधित कुटुंबांना घरे बांधून देऊन पुनर्वसन करण्यात आले. दि प्राईड इंडिया आणि लालबागचा राजा ट्रस्ट या सेवाभावी संस्थेने पुढाकार घेऊन ६६ घरांचे पुनर्वसन झाले खरे, मात्र जुई पुनर्वसन जागा ही पुनर्वसन कमिटी आणि दि प्राईड इंडिया यांच्या नावावर आहे.

ती गावठाण व्हावी यासाठी तेथील स्थानिक ग्रामस्थांचे गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरु आहेत. शासकीय अधिकारी तत्कालीन प्रांताधिकारी शिवाजीराव पाटील यांचे योग्य सहकार्य लाभले होते.

आता जरी ही कार्यवाही पूर्ण झाल्यास पुनर्वसन झालेल्या जमिनीचा विषय कायमचा मार्गी लागेल अशी प्रतिक्रिया पुनर्वसन कमिटी सदस्य तथा जुईचे ज्येष्ठ ग्रामस्थ दत्ता देवळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

२५ जुलै २००५ रोजी कोकणात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन ठिकठिकाणी भूस्खनच्या घटना घडल्या. त्यामध्ये महाड तालुक्यातील जुई, कोंडीवते, दासगाव आणि रोहन येथे भूस्खलन होऊन ११९ जण भूस्खलनात अडकले होते.

त्यामध्ये सर्वात मोठी हानी जुईकरांची झाली. जुई येथील ९४ लोकांना जीव गमवावे लागले. रात्री आठच्या दरम्यान ही घडना घडल्यामुळे तात्काळ त्याठिकाणी मदतकार्य पोहचू शकले नाही. कारण महाडकडून येणारे मार्ग तसेच म्हाप्रळकडून येणारे मार्ग देखील ठिकठिकाणी खचल्यामुळे यंत्रणा पोहचणे मोठे आव्हान होते.

मात्र तत्कालीन आमदार माणिकराव जगताप यांच्यामुळे सर्व प्रकारची मदत जुई येथे पोहचू शकली आणि भुस्खनामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यापासून ते जखमी तसेच नातेवाईकांना उपचार त्याचबरोबर जीवनाश्यक वस्तू विविध संस्थांच्या माध्यमातून पोहचू शकली.

त्यानंतर ज्यांचा निवारा गेला अशा ६६ जणांचे पुनर्वसन देखील सरकारच्या विनंतीला मान देऊन दि प्राईड इंडिया आणि लालबागचा राजा ट्रस्ट या सेवाभावी संस्थानी केले.

त्या काळ रात्रीच्या जखमा आजही जुईकरांसाठी ओल्याच राहिल्या असल्याचे भेटीदरम्यान ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. आजही अतिवृष्टी झाल्यावर त्या काळ रात्रीची भीती डोळ्यासमोर उभी राहते अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.

पुनर्वसन होऊन ६६ घरांची नवीन वसाहत वसली आहे. मात्र ज्या ठिकाणी पुनर्वसन करून दिले आहे, ती जमीन आजही पुनर्वसन कमिटी आणि दि प्राईड इंडिया यांच्याच नावे आहे. ती जमीन गावठाण व्हावी यासाठी स्थानिक ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. शासकीय अधिकारी देखील योग्य ते सहकार्य करण्यास तयार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या पाठपुराव्याने पुनर्वसन जमीन गावठाण होऊ शकेल.
- दत्ता देवळे, स्थानिक ग्रामस्थ तथा पुनर्वसन कमिटी सदस्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT