

संतोष उतेकर
सुधागड: सध्या देशामध्ये १९ राज्यांत एसआयआर विशेष सखोल पुनरीक्षण २०२६) अंतर्गत बीएलओ चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, राष्ट्रीय कामाच्या नावाखाली केवळ शिक्षकांनाच वेठीस धरले जात असल्याने शिक्षक वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
'राष्ट्रीय काम फक्त शिक्षकांनीच करायचे का? इतर विभागांतील कर्मचाऱ्यांना यातून सूट का?' असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि ताणामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संताप. याबाबत सुधागड तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समिती अध्यक्ष मोरेश्वर कांबळे यांनी प्रशासनावर घणाघाती टीका केली आहे.
मागील महिन्यात पेण (रायगड) येथील न.पा.च्या सभागृहात SIR कामाचे प्रशिक्षण घेत असताना प्राथमिक शिक्षक आसिफ दळवी यांना कामाच्या प्रचंड तणावामुळे हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शिक्षकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा प्रश्न कमालीचा ऐरणीवर आला आहे. बऱ्याच वेळा शिक्षकांच्या रजा देखील नाकारल्या जात आहेत.
प्रशासनाकडून कोणताही निश्चित किंवा स्पष्ट निर्णय दिला जात नाही. शिक्षक दुहेरी कात्रीत सापडले आहेत. शिक्षकांना सतत अशैक्षणिक कामात गुंतवून ठेवल्यामुळे वर्गातील अध्यापनाकडे दुर्लक्ष होत असून, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता झपाट्याने ढासळत आहे.
शिक्षक शाळेत न राहता घरोघरी फिरत असल्याने "शिक्षक शिकवत नाहीत" असा चुकीचा संदेश समाजात जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वेळेत काम पूर्ण करण्याचे आदेश आणि दुसरीकडे शाळेची जबाबदारी, यामुळे शिक्षक मानसिक तणावाखाली वावरत आहेत.
अनेक जिल्ह्यांमध्ये SIR कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शिक्षकांना शाळांमधून 'पूर्ण वेळ कार्यमुक्त' करण्यात आले आहे. मग हाच नियम रायगड जिल्ह्यात का लागू केला जात नाही? असा सवाल शिक्षक विचारत आहेत.
शाळांमध्ये आधीच शिक्षकांची प्रचंड कमतरता असताना, उपलब्ध शिक्षकांना ऑनलाईन बदली प्रक्रिया आणि अशैक्षणिक कामांच्या चक्रव्यूहात अडकवले जात आहे. दुर्गम भागातील शाळांना रस्ते नसल्याने तिथे शिक्षक जायला तयार होत नाहीत आणि दुसरीकडे नवी भरतीही थांबली आहे. या सर्व गोंधळात विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा बळी जात असून प्रशासकीय उदासीनता आणि चुकीच्या धोरणांमुळेच आजची शिक्षण व्यवस्था कोलमडत चालली आहे.
- उमेश तांबट, पाच्छापूर ग्रामपंचायत सदस्य, सुधागड
आम्ही शालेय कामकाज सांभाळत असताना राज्यातील जवळपास सर्वच विभागांची कामे करत आहोत. केवळ 'MSEB' चे काम सोडले, तर शासकीय योजनांपासून ते निवडणुकांच्या सर्वेक्षणापर्यंत प्रत्येक काम शिक्षकांच्या माथी मारले जाते. राष्ट्रीय कामाचा आम्हाला आदर आहे, पण इतर विभागातील कर्मचारी काय फक्त बघ्यांची भूमिका घेण्यासाठी आहेत का? जर इतर जिल्ह्यांप्रमाणे रायगडमधील शिक्षकांनाही SIR च्या कामासाठी पूर्ण वेळ कार्यमुक्त केले नाही, तर विद्यार्थ्यांचे नुकसान आणि शिक्षकांचे आरोग्य बिघडण्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल.
- मोरेश्वर कांबळे, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक समन्वय समिती, सुधागड
एसआयआर च्या कामात शिक्षक व शैक्षणिक यंत्रणा व्यस्त आहेत. शिक्षकांना शाळेत वेळ देता यावा यासाठी शाळेच्या वेळा बदलण्यात आल्या असून सकाळी शाळा भरवल्या जात आहेत. मात्र त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. शैक्षणिक कामात अडथळा निर्माण होत आहेत. शिक्षक अतिरिक्त कामात व तणावात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
- सादुराम बांगारे, गटशिक्षणाधिकारी, सुधागड