Mahad Paddy Bonus Pudhari
रायगड

Mahad Paddy Bonus: खरेदी-विक्री संघात विकलेल्या भाताचा बोनस रखडला

महाड तालुक्यातील ६९६ शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा; नोव्हेंबरची नोंदणी तोंडावर, पण जुना बोनसच नाही

पुढारी वृत्तसेवा

रघुनाथ भागवत

खाडीपट्टा: महाड तालुक्यासह खाडीपट्टा भागातील भात उत्पादक शेतकऱ्यांना सरकारला विकलेल्या भाताचा बोनस प्राप्त झालेला नाही. महाड तालुक्यातील ८७७ नोंदणींपैकी ६९६ शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

महाड तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघात शेतकऱ्यांनी आपला भात हमीभावाने जमा केला होता, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर एप्रिल-मे महिन्यात जमा होणारा बोनस आज सप्टेंबर महिना सुरू झाला तरी जमा झालेला नाही. त्यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून संताप व्यक्त करत आहेत.

खाडीपट्टी भाग हा प्रामुख्याने भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. येथील शेतकऱ्यांनी गेल्या हंगामातील भात शासनाच्या खरेदी-विक्री संघामध्ये नोंदणी करून विकला होता. शासनाच्या नियमानुसार, प्रति हेक्टरी २० हजार रुपये रक्कम शेतकऱ्यांना बोनस म्हणून दिली जाते.

ही रक्कम साधारणपणे भात विक्रीनंतर ३ ते ४ महिन्यांत म्हणजेच एप्रिल-मे पर्यंत शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात थेट जमा होते. मात्र यावर्षी सप्टेंबरचा दुसरा आठवडा उजाडला तरी तालुक्यासह खाडीपट्टीतील शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही. यामुळे खाडीपट्टीतील शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

खरीप हंगाम संपून ८ महिने झाले, तसेच तीन अधिवेशने पार पडली. मात्र बोनस यावर्षी रखडला आहे. आता पुन्हा नवीन भात हंगाम सुरू होत असून, नोव्हेंबर महिन्यात खरेदी-विक्री संघामार्फत नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. गेल्या वर्षीचा बोनसच मिळाला नसताना पुन्हा नवीन नोंदणी करायची कशी, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

मुलांचे शिक्षण, सण, उत्सव साजरा करण्यासाठी आता पैसे कुठून आणायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. रखडलेला बोनस तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, बोनस विलंबाचे कारण प्रशासनाने जाहीर करावे, नोव्हेंबरच्या नवीन नोंदणीपूर्वी सर्व थकबाकी निकाली काढावी, बोनसच्या रकमेसोबत विलंबाबद्दल व्याज द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

दरम्यान, ऐन गणेशोत्सव सण तोंडावर असताना हातात पैसा नसल्याने खाडीपट्टीतील शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने या प्रश्नात तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांचा बोनस त्वरित वितरित करावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. या संदर्भात खरेदी-विक्री संघाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, "वरिष्ठ स्तरावरून निधी प्राप्त न झाल्याने विलंब झाला असून, लवकरच बोनस जमा होण्याची अपेक्षा आहे." असे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT