महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. महाड शहरातील निवडणुकीला दुपारी सव्वाच्या सुमारास अचानक तणाव निर्माण झाला.
नवे नगर शाळा क्रमांक ५ येथील मतदान केंद्राबाहेर शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते विकास गोगावले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष सुशांत झांबरे आणि त्यांच्या पथकाकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप गोगावले यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना गोगावले म्हणाले की, हल्ल्याच्या प्रयत्नादरम्यान आपल्यावर रोखलेले रिव्हॉल्वर जप्त करून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने परिसरात बंदोबस्त वाढवला असून रॅपिड अॅक्शन फोर्सची तुकडी घटनास्थळी दाखल झाली आहे.
या प्रकरणावर राष्ट्रवादीच्या विधानसभा नेत्या स्नेहल जगताप यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “काल (सोमवार) रात्रीपासूनच शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने महाडमध्ये येत होते. आजचा प्रकार जाणीवपूर्वक निर्माण केलेला आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे आरोप–प्रत्यारोपांना अधिक जोर आला आहे.
घटना समजताच पोलिसांनी मतदान केंद्रासह संपूर्ण शहरात सुरक्षा वाढवली आहे. संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत, जेणेकरून पुढील कोणताही अनुचित प्रकार घडू नये.