Mahad civic issues pudhari photo
रायगड

Mahad civic issues : दीडशे वर्षांनंतरही महाडनगरीत मूलभूत सुविधांचा अभाव

नगरपरिषद हद्दीत पार्किंग; घनकचरा व्यवस्थापन; क्रीडांगणासह फेरीवालाक्षेत्र उभारण्याकडे आजही दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

महाड : श्रीकृष्ण बाळ

दीडशे वर्षांचा टप्पा पूर्ण करणाऱ्या ऐतिहासिक महाड नगरपालिका हद्दीत आजही आधुनिक नागरी सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या आणि विस्तारलेल्या शहराच्या गरजा लक्षात घेता पार्किंग संकुल, जलतरण तलाव, सुसज्ज क्रीडांगण आणि नियोजित फेरीवाला क्षेत्र नाही. गेली दीडशे वर्षांनंतरही शहरासाठी आवश्यक नागरी सुविधा निर्माण झाल्या नाहीत याबाबत नगरवासियांमध्ये नाराजीच दिसून येते.

रायगड जिल्ह्याचे प्रमुख व्यापारी, शैक्षणिक, ऐतिहासिक आणि प्रशासकीय केंद्र असलेल्या महाड नगरपरिषदेला १५० वर्षांचा समृद्ध इतिहास लाभला आहे. सामाजिक परिवर्तन, व्यापार, शिक्षण आणि सांस्कृतिक चळवळींचे केंद्र म्हणून महाडने राज्याच्या इतिहासात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे सत्याग्रहामुळे महाडला जागतिक स्तरावर ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.

महाड हे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे शहर असून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, पर्यटक आणि शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ येथे असते. शहरातील मुख्य बाजारपेठ, शासकीय कार्यालये, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्था याठिकाणी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र नियोजित सार्वजनिक पार्किंगची सुविधा नसल्यामुळे रस्त्यांवरच वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि आपत्कालीन सेवांना अडथळे निर्माण होतात. भविष्यातील वाढती वाहनसंख्या लक्षात घेऊन बहुमजली पार्किंग संकुल उभारणे ही काळाची गरज बनली आहे.

महाडमध्ये क्रीडा क्षेत्रात मोठी क्षमता असलेले अनेक युवक-युवती असूनही आधुनिक क्रीडा सुविधा अपुऱ्या आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे धावपटू, जलतरणपटू आणि इतर खेळाडू घडविण्यासाठी सुसज्ज क्रीडांगण, ॲथलेटिक्स ट्रॅक, इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि आधुनिक जलतरण तलावाची उभारणी आवश्यक आहे. जलतरण तलावामुळे केवळ खेळाडू तयार होणार नाहीत, तर पूरप्रवण भाग असल्याने विद्यार्थ्यांना जलसुरक्षा आणि पोहण्याचे प्रशिक्षणही देता येईल. हे आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरेल.

शहरातील फेरीवाले आणि लघुव्यावसायिक हे स्थानिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहेत. मात्र नियोजित जागेअभावी अनेक ठिकाणी रस्त्यांवर व्यवसाय करावा लागतो. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि व्यापारी तसेच नागरिकांमध्ये वाद निर्माण होतात. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून सर्व आवश्यक सुविधा असलेला स्वतंत्र हॉकर झोन विकसित करण्याची आवश्यकता आहे. अशा झोनमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, कचरा व्यवस्थापन, प्रकाशयोजना आणि अग्निसुरक्षा यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास फेरीवाल्यांना सन्मानाने व्यवसाय करता येईल आणि शहरातील वाहतुकीवरील ताणही कमी होईल.

महाडच्या वाढत्या नागरी विस्ताराचा विचार करता उद्याने, खुली मैदाने, सार्वजनिक व्यायाम केंद्रे, सायकल ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे आणि मुलांसाठी आधुनिक खेळाची मैदाने यांचीही आवश्यकता आहे. शहर विकास आराखड्यात या सर्व सुविधांचा समावेश करून नियोजन करणे आवश्यक आहे.

विकासाचा आराखडा तयार करण्याची आवश्यता

महाड नगरपरिषदेला १५० वर्षे पूर्ण होत असताना हा केवळ गौरवाचा क्षण नसून शहराच्या पुढील ५० वर्षांच्या विकासाचा आराखडा तयार करण्याची संधी आहे. राज्य शासनाच्या विविध नागरी विकास योजना, अमृत योजना, मुख्यमंत्री शाश्वत शहर विकास उपक्रम, क्रीडा विभाग आणि इतर निधींच्या माध्यमातून आधुनिक नागरी सुविधा उभारता येऊ शकतात.

नियोजनबद्ध आणि आधुनिक शहर व्हावे...

ऐतिहासिक वारसा जपत आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे हीच महाडच्या विकासाची पुढील दिशा असावी. पार्किंग संकुल, जलतरण तलाव, सुसज्ज क्रीडांगण, नियोजित हॉकर झोन आणि इतर सार्वजनिक सुविधा उभारण्यात आल्यास महाड हे केवळ इतिहासासाठी नव्हे, तर नियोजनबद्ध आणि आधुनिक शहर म्हणूनही राज्यात आदर्श ठरू शकते, असा नागरिकांना विश्वास आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT