महाड शहरातील पार्किंग प्रश्न मार्गी लागणार? pudhari photo
रायगड

Mahad parking problem solution : महाड शहरातील पार्किंग प्रश्न मार्गी लागणार?

नगरपालिकेच्या आजच्या सभेत निर्णय अपेक्षीत

पुढारी वृत्तसेवा

महाड : शहरात अतिक्रमण हटवण्याच्या कारवाया जोरात सुरू असताना पार्किंग व्यवस्थेच्या प्रश्नाकडे मात्र महाड नगर परिषदेचे स्पष्ट दुर्लक्ष होत असल्याची तीव्र टीका नागरिकांकडून होत आहे. रस्ते मोकळे करण्याच्या नावाखाली फेरीवाले व लहान व्यावसायिकांवर कारवाई केली जात असली, तरी वाहनधारकांसाठी पर्यायी पार्किंगची कोणतीही ठोस व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

शहरातील विविध भागांत ‌‘नो पार्किंग‌’चे फलक लावलेले दिसतात; मात्र ‌‘पार्किंग कुठे करायचे?‌’ या मूलभूत प्रश्नाचे उत्तर प्रशासनाकडे नसल्याची वस्तुस्थिती आहे. परिणामी, नागरिकांना नियमांचे पालन करणे कठीण होत असून अनेकदा दंडात्मक कारवाईलाही सामोरे जावे लागत आहे.

विशेष म्हणजे, सुमारे 160 वर्षांचा इतिहास असलेल्या महाड नगर परिषदेने आजपर्यंत एकही सुसज्ज, नियोजित सार्वजनिक पार्किंग उभारलेले नाही, ही बाब अधिकच गंभीर मानली जात आहे. वाढत्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालला आहे. मुख्य बाजारपेठ, शासकीय कार्यालयांच्या परिसरात आणि गर्दीच्या रस्त्यांवर वाहनांची अनियमित पार्किंग मोठ्या प्रमाणावर होत असून त्यातून वाहतूक कोंडीची समस्या तीव्र बनत आहे.

नागरिकांच्या मते, अतिक्रमण हटवण्याची कारवाई एकतर्फी न राहता सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे. “नो पार्किंग”चे फलक लावणे किंवा दंड आकारणे यापेक्षा आधी नियोजित पार्किंगची सोय उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अन्यथा ही कारवाई केवळ दंड वसुलीपुरती मर्यादित असल्याचा आरोप अधिक तीव्र होऊ शकतो.

दरम्यान, शहरातील रिकाम्या जागांचा वापर, मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्प, तसेच सार्वजनिक-खासगी भागीदारीतून पार्किंग सुविधा उभारण्याचे पर्याय पुढे येत आहेत. मात्र याबाबत कोणतीही ठोस अंमलबजावणी अद्याप दिसून येत नाही.

एकूणच, अतिक्रमण हटवण्याबरोबरच पार्किंगचा प्रश्न सोडवला गेला नाही, तर शहरातील वाहतूक व्यवस्थेचा गोंधळ अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी आता प्रशासनाकडून केवळ कारवाई नव्हे, तर नियोजनबद्ध उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली आहे.

  • महाड नगर परिषदेच्या आज आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेच्या विषयी पत्रिकेमध्ये एकूण 58 विषयांपैकी 47 वा विषय हा जुना पोस्ट परिसरातील रस्त्यावर वाहने पार्किंग मुळे स्थानिक दुकानदारांमार्फत करण्यात आलेल्या परिसरात नऊ पार्किंग झोनची मान्यता देण्याबाबत विचार होणार आहे या पार्श्वभूमीवर महाड नगरपरिषद शहरात किती ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आपल्या मालकीच्या जागेमध्ये करणार अशी विचारणा महाडकर नागरिकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT