Tree fall Bus Mahad Bus Stand
महाड: महाड एस.टी. बसस्थानकात फलाटावर उभ्या असलेल्या साखरपा–ठाणे या मार्गावरील एस.टी. बसवर स्थानकातील एका जुन्या झाडाची मोठी फांदी कोसळल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती एस.टी. प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून महाड तालुक्यात सतत जोरदार पाऊस सुरू असून, त्यातच मध्येच येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडाची फांदी कमजोर होऊन तुटली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेच्या वेळी संबंधित बस फलटावर थांबलेली असल्याने मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली असून बसस्थानक परिसरातील धोकादायक झाडांची तात्काळ छाटणी करणे अत्यावश्यक असल्याचे प्रवासी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. एस.टी. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन आवश्यक ती उपाययोजना तातडीने करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.