महाड ः महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण खात्याकडून 10 ऑगस्ट 2004 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते लोकार्पित झालेल्या महाडच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील नाट्यगृहाचे काम नूतनीकरणासाठी 1 जानेवारीपासून बंद राहणार असल्याची माहिती या स्मारकाचे व्यवस्थापक प्रकाश जमदाडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिले आहे.
2021 मध्ये आलेल्या महापुरानंतर या स्मारकातील विविध ठिकाणची यंत्रणा दुरुस्ती करण्यात आली होती, मात्र मागील काही वर्षात ती पुन्हा नादुरुस्त झाल्याने समाज कल्याण खात्यामार्फत या संदर्भात स्थानिक व्यवस्थापनाकडून देण्यात आलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
2004 मध्ये महाड करता या लोकार्पित झालेले हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात गेल्या दोन दशकांमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सद्यस्थितीमध्ये या स्मारकाचे नियंत्रण समाज कल्याण खाते अंतर्गत येणार्या बार्टी या संस्थेकडे सोपविण्यात आले आहे.
शासनाच्या विविध योजना संदर्भात या ठिकाणी होणार्या कार्यक्रमाबरोबरच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील वैविध्यपूर्ण पद्धतीने साकारल्या जाणार्या कार्यक्रमांचे आयोजनही या स्मारकामध्ये गेल्या दोन दशकांपासून मोठ्या प्रमाणात करण्यात येते. या स्मारकाची निर्मिती झाल्यापासून महाड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरिता हे स्मारक व हा परिसर शासनासाठी महत्त्वपूर्ण ठरला होता आगामी जानेवारी महिन्यापर्यंत चालणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता चालू वर्षी या ठिकाणी आता निवडणूक यंत्रणे संदर्भातील प्रक्रिया होणार किंवा कसे असा प्रश्न आता स्थानिक महाड नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मागील काही वर्षापासून या नाट्यगृहातील वातानुकलित यंत्रणा बंद असल्याने या ठिकाणी होणार्या कार्यक्रमातील येणार्या रसिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. स्थानिक महाडकर नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासून असलेली मागणी आता शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून मंजूर झाल्याने काही काळानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा नव्याने नवीन यंत्रणेच्या साक्षीने कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल असा विश्वास महाडकर नागरिक व्यक्त करीत आहेत.
नवीन यंत्रणा बसविणार
आंबेडकर स्मारकातील नाट्यगृहा अंतर्गत पत्रे बदलणे ,पडदे बदलणे, नवीन खुर्च्यांची निर्मिती, सेंट्रल वातानुकूलित यंत्रणा बसविणे, पीओपी ची नवीन निर्मिती, डख नवीन तयार करणे ,प्रकाश यंत्रणा व ध्वनीयंत्रणेची नव्याने निर्मिती ,ड्रेसिंग रूम सुसज्ज करणे ,लाईट कंट्रोल रूम मधील लाईट ऑपरेटर स्विच नवीन करणे तसेच नाट्यगृहात प्रेक्षक लाईट योजना नव्याने निर्माण करण्याचा समावेश आहे. ब्लोअर डक एसी यंत्रणा नव्या स्वरूपात निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती श्री प्रकाश जमदाडे यांनी याप्रसंगी दिली आहे.