शब्दांनो मागुते या... असे म्हणत ज्येष्ठ कवी लेखक मधु मंगेश कर्णिक यांनी गेली 70 वर्षे साहित्याचा जागर सुरू ठेवत आपल्या शब्द सामर्थ्यावर अखंड मराठीजनांना जिंकण्याची किमया केली. साहित्याचे अखंड चिंतन करून सद्विचारांची शिदोरी जनमानसाला देण्याचे काम त्यांनी अखंडपणे सुरू ठेवले आहे. त्यांचा साहित्य महिमा सहा ते सात दशकांमध्ये सातत्यपूर्ण असा सुरू आहे. यामुळेच त्यांनी लेखन क्षेत्रामध्ये आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांची समृद्ध आणि वाड्.मयीन वाटचाल साहित्याचे अनेक पैलू उलगडून दाखवते. आतापर्यंत साहित्याने समाज परिवर्तनाच्या गाड्यात अग्रणी भूमिका घेतली.
मानवी मनामध्ये सद्विवेकाचा जागर करून कृतिशीलता आणली. हाच धागा मधुभाईंच्या साहित्यात अखंडितपणे पुढे जाताना दिसतो. साहित्यवारीचा वारकरी बनून लोकशिक्षणाची पताका खांद्यावर घेऊ न माणसाचे अंतरंग बदलण्याचे काम मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्यातून झालेले पाहायला मिळते. मानवी जीवनात नवप्रकाश आणताना जुन्या चालीरिती, जातीपंथ या सीमा रेषा पुसून एक अखंडित समाज घडविण्याच्या प्रक्रियेत मधुभाईंच्या साहित्याचा मोठा वाटा आहे. कथा, कादंबरी, ललित गद्य असे विपुल वाड्.मय प्रकार त्यांनी हाताळले. कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र या माध्यमातून मराठी साहित्याला एक नवा आयाम दिला.
मधु मंगेश कर्णिक यांची वाटचाल ही शून्यातून सुरू झाली. कणकवली तालुक्यातील करूळ या गावी त्यांचा जन्म झाला तो गरिबीमध्येच. सातव्या इयत्तेमध्ये गावात शिकून ते आपल्या पुढच्या वाटा शोधण्यासाठी बाहेर पडले. चार वर्षांचे असताना वडिलांचे छत्र गमावले. त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षी आईचे निधन झाले. अशा स्थितीवर मात करून शिक्षण घेत ते मुंबईसारख्या महानगरात पोहोचले. 1951 मध्ये मॅट्रिकची परीक्षा दिली. त्यानंतर परिवहन खात्यात लेखनिक म्हणून नोकरीला प्रारंभ केला. कालांतराने कोल्हापूर आणि मुंबई येथे प्रवास झाला. आणि या प्रवासातच अनेक अनुभवातून त्यांचे साहित्य बहरत गेले. करूळचा मुलगा या त्यांच्या आत्मचरित्रात हा सर्व प्रवास आपल्याला अनुभवता येतो. त्यांच्या लिखाणाला समाज प्रबोधनाची जोड आहे. समाज घडविण्याची ताकद आहे. जीवाचे जीवत्व आणि त्यातले मर्म हे सर्व त्यात सामावले आहे. आनंदाचा कल्लोळ मांडताना दु:खाची किनारही ते अलगद सांगून जातात. संवर्धनापलीकडील सौदार्य आणि आत्म्यापलीकडील परमार्थ हा जीवनानुभव त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतो. माहीमच्या खाडीतील विश्व असो किंवा जुईलीमधील जीवनभाव असो यातून तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब उभे राहते. आपण जे भोगले ते इतरांना भोगावे लागू नये म्हणून करूळ या जन्मगावी नाथ पै ज्ञानप्रबोधीनी हे हायस्कूल सुरू केले. लोकांना वाचून शहाणे करावे म्हणून वाचनालय उभारले.
हा सामाजिक कामाचा कणा बहरत असताना दुसऱ्या बाजूला साहित्यही फुलत गेले. ‘कोकणी गं वस्ती’ मधून कोकणच्या निसर्ग सौंदर्याच्या जीवनशैलीच्या आणि कोकणी माणसाच्या विचारशक्तीच्या गोष्टी त्यांनी समाजासमोर ठेवल्या. त्यांच्या साहित्यात मना सज्जना भक्ती पंथेची जावे... हा समाजभाव दिसतो तसा विचारांचा सहत्वगुणही जाणवतो. ममत्वाच्या गुजगोष्टीही सापडतात. माहीमची खाडी, भाकरी आणि फूल, संधीकाल या कादंबऱ्या मराठी साहित्यातील अढळ स्थान निर्माण करणाऱ्या आहेत. मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाचे भावविश्व आणि जीवनदर्शन माहीमच्या खाडीमध्ये सापडते. भाकरी आणि फूल मधून उच्च-नीच हा समाजातील भावबंध ठळकपणे पुढे येतो. जगण्याच्या पद्धती अधोरेखित करणारा संधीकाल, बदलाच्या संवेदनांचा आरसा ठरतो. चांगल्या विचारांचे स्फुल्लिंग फुलवावे, वाईट विचारांचे मळभ दूर व्हावे म्हणून अनेक साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून प्रबोधनाच्या गोष्टी मांडल्या. हा धागा मधुभाईंच्या साहित्यात सापडतो.देवत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती, असे दृढ अर्थाने सांगता येईल. असे विचार मधुभाईंच्या साहित्यात सापडतात. एक समर्पित भावनेने समाजाप्रती निर्माण केलेला साहित्य जागर अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरला आहे. अनेकदा माणसाला आज मी ब्रह्म पाहिले, असा आत्मसाक्षात्कार होतो आणि आपलाच आत्मशोध आपण सुरू करतो. मधु मंगेश कर्णिकांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतर प्रत्येकालाच याची जाणीव होते. प्रकाशाच्या नवीन पाऊलवाटा मग सापडू लागतात. यातूनच मग विचारांचे ऐश्वर्य फुलते. हे सारे मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्यात आणि विचारांत सामावलेले आहे.
साधेसुधे मराठमोळे असे साहित्य वाचताना मनाला उभारी येऊ लागते. एक आधारवड वाटावा तसे विचार मनात गुंजी घालतात. विचारांचे स्फुल्लिंग यातून प्रज्वलित होते. एवढी ताकद या साहित्यातून आपल्याला सापडली आहे. एखाद्या साहित्यिकाच्या साहित्यविश्वातून जेव्हा माणसाच्या मनाला उभारी मिळते, जे का रंजले गांजले तेची म्हणे जो आपुले... हा विचार सापडतो. त्या साहित्याचे श्रेष्ठत्व हे अगणितच असते. चिंतनशील विचारांतून आलेला तो पाण्याचा निर्झर असतो. शुद्ध मनाचा एक प्रकाशमान चेहरा त्यातून सापडतो. म्हणूनच मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्याच्या या विचारमंथनात आपण हरवून जातो आणि मग एकच प्रतिक्रिया समोर येते, देवत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती.
देवत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती, असे दृढ अर्थाने सांगता येईल, असे विचार मधुभाईंच्या साहित्यात सापडतात. एक समर्पित भावनेने समाजाप्रती निर्माण केलेला साहित्य जागर अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरला आहे. अनेकदा माणसाला आज मी ब्रह्म पाहिले, असा आत्मसाक्षात्कार होतो आणि आपलाच आत्मशोध आपण सुरू करतो. मधु मंगेश कर्णिकांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतर प्रत्येकालाच याची जाणीव होते. मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्य प्रवासाची जी सुंदर ओळख त्यांच्या होत असलेल्या नागरी सत्काराच्या निमित्ताने येथे देत आहोत.