

कर्जत : हेमंत देशमुख
कर्जतचा बटाटावडा, क्रश चिक्की, कड़वे वाल आदी खाद्य पदार्थांसाठी कर्जत प्रसिद्ध आहे. एवढेच नव्हे तर प्रसिद्ध मिरची मसाला बाजारपेठ म्हणून तर कर्जतची फारच जुनी ओळख आहे. रायगडच नव्हे तर ठाणे, पुणे, मुंबईहून सुद्धा या बाजारात वर्षानुवर्षे ग्राहक येतात आणि आपल्या आवडीची मिरची व खडे मसाले खरेदी करतात.
विशेष म्हणजे परदेशात असलेल्या आपल्या नातेवाईकांना सुद्धा कर्जतची मिरची घेऊन तयार मसाला पाठवणारांची संख्याही आहे. या मिरची बाजाराला सुमारे 75 वर्षे होत आली आहेत.
सुमारे पंचाहत्तर वर्षांपासून कर्जतचा मिरची बाजार भरतोय. महावीर पेठेत 10-12 दुकानांमध्ये मिरची व खडे मसाले विक्रीसाठी असतात. ही मिरची हैदराबाद - वारंगल, आंध्रप्रदेश - गंटूर, तेलंगणा आदी राज्यातून पुण्यात येते आणि तेथून ती कर्जतच्या बाजारात उपलब्ध होते. हल्ली तयार मसाले मिळत असले तरी पहिल्यापासून ज्यांना कर्जतच्या मसाल्याची सवय आहे ते वर्षभरासाठी मसाला करण्यासाठी कर्जतची बाजारपेठ गाठतात. तसेच ग्रामीण भागात लग्न सोहळ्यासाठी भोजनाचा आस्वाद चांगला चाखायला मिळावा म्हणून 15 ते वीस किलो मसाला करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. खरा हा बाजार चार ते पाच महिनेच असतो.
जानेवारी ते मे या कालावधीत ही मिरची विकत घेण्यासाठी अगदी पेण, अलिबाग, पनवेल, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, मुरबाड, शहापूर, लोणावळा, पुणे येथूनच नव्हे तर मुंबईतूनही ग्राहक येत असतात. परदेशातही आपल्या नातेवाईकांना कर्जत मधून मिरची घेऊन मसाला तयार करून पाठवण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. यंदा किंमतीच्या बाबतीत मिरची थोडी तिखट आहे परंतु तरीही मिरची व खडे मसाले घेण्यासाठी बहुतांश दुकानात ग्राहकांची गर्दी असते. मिरची सहा - सात प्रकारची असते.
खरंतर दरवर्षी आमच्याकडे 15 जानेवारी नंतर मिरची खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी सुरू होते मात्र यंदा मिरचीची आवक काहीशी घटल्याने बाजारात मिरची उशिरा आली मात्र आता ग्राहकांनी मिरची खरेदी करणे सुरुवात केली आहे मागील वर्षापेक्षा यंदा मिरचीच्या दारात वीस ते पंचवीस टक्के वाढ झालेली आहे तरीसुद्धा ग्राहकांचा मिरची खरेदीचा उत्साह कायम आहे. सुमारे मे महिन्यापर्यंत मिरची खरेदीसाठी ग्राहक येत असतात.
सचिन जयंतीलाल परमार, मिरची व्यापारी कर्जत
आम्ही दरवर्षी मसाला बनविण्यासाठी कर्जत बाजारपेठेतूनच मिरचीची खरेदी करतो या बाजारपेठेत विविध प्रकारच्या उत्तम दर्जाच्या तिखट मिरच्या उपलब्ध असतात मिरची बरोबरच गरम मसाल्यासाठी येथे ग्राहकांची गर्दी असते.
अपर्णा डेरवणकर, गृहिणी आकुर्ले