२८ किलोची बॅग खांद्यावर घेऊन आकाश शुक्ला महाराष्ट्रात दाखल झाला 
रायगड

Lucknow youth world tour visit Raigad Fort-लखनऊच्या तरुणाची ९,४०० किमी.ची पायपीट; रायगडाची ओढ घेऊन आकाश शुक्ला महाराष्ट्रात दाखल

लखनऊच्या तरुणाची जगभ्रमंती! ९,४०० किलोमीटरची पायपीट; किल्ले रायगडाची ओढ घेऊन आकाश शुक्ला महाराष्ट्रात दाखल, २८ किलोची बॅग खांद्यावर घेऊन ऐतिहासिक स्थळांचा शोध

पुढारी वृत्तसेवा

नाते : ईलयास ढोकले

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील २३ वर्षीय आकाश शुक्ला हा तरुण १ ऑक्टोबर २०२५ पासून पायी जगभ्रमंतीसाठी निघाला आहे. तब्बल ९,४०० किलोमीटरचा प्रवास पायी पूर्ण करत तो आता किल्ले रायगडाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांना भेट देत त्या ठिकाणचा इतिहास जाणून घेणे, राजांनी केलेले राज्यकारभार आणि ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करणे, हा त्याच्या या अनोख्या प्रवासाचा मुख्य उद्देश आहे.

आकाश शुक्ला याने आतापर्यंत आंध्र प्रदेश, केरळ, गोवा, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांचा पायी प्रवास पूर्ण केला असून, आता महाराष्ट्रात त्याची भ्रमंती सुरू झाली आहे. खांद्यावर तब्बल २८ किलो वजनाची बॅग घेऊन तो रोज पायी प्रवास करीत आहे.

प्रवासादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, काही ठिकाणी अनावश्यक त्रासही सहन करावा लागतो. मात्र, मानसिक तयारी, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने आपला प्रवास सुरूच ठेवला आहे. प्रवासात मुक्कामाच्या ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून मिळणारे सहकार्य त्याच्यासाठी मोठा आधार ठरत आहे.

अनेक ठिकाणी नागरिक आवर्जून त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतात. अनोळखी लोकांकडून मिळणारे प्रेम आणि मदत हीच या प्रवासातील खरी ताकद असल्याचे त्याने सांगितले.

महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारशाबद्दल, विशेषतः किल्ले रायगडाबद्दल आकाशला विशेष आकर्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा किल्ले रायगड प्रत्यक्ष पाहण्याची त्याची इच्छा आज पूर्ण होणार आहे. रायगडावर पोहोचण्याचा क्षण त्याच्यासाठी अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय ठरणार आहे. इतिहास जाणून घेण्याच्या जिद्दीने सुरू केलेली ही पायपीट तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT