

Panvel RTO Action
पनवेल : वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकपट्टी (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक असतानाही अद्याप नंबरप्लेट न बसविलेल्या वाहनधारकांविरोधात पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. २० ते ३० नोव्हेंबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे पनवेल, उरण, कर्जत आणि खालापूर परिसरातील वाहनधारकांनी तातडीने नंबरप्लेट बसवून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या १७ नोव्हेंबर रोजी झालेल्या आढावा बैठकीतील निर्देश आणि परिवहन आयुक्तांनी १९ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार ही मोहीम राबविली जात आहे. कारवाईसाठी पनवेल आरटीओच्या वायुवेग पथकांसह स्थानिक वाहतूक पोलिसांची संयुक्त पथके तैनात करण्यात आली आहेत. शहरातील प्रमुख रस्ते, महामार्ग, तपासणी नाके आणि गर्दीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी सुरू आहे.
दुचाकी, तीनचाकी, चारचाकी तसेच प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून एचएसआरपी बसविण्यात आली आहे की नाही, याची खातरजमा केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंड आकारण्यात येणार आहे.
एचएसआरपी बसविण्यासाठी वाहनधारकांना ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. वाहनधारकांनी https://mhhsrp.com या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून जवळच्या फिटमेंट सेंटरमध्ये नंबरप्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन आरटीओ प्रशासनाने केले आहे.
पनवेल आरटीओ कार्यक्षेत्रात पनवेल, कळंबोली, खारघर, उलवे, तळोजा, खोपोली, कर्जत, उरण आणि वडखळ परिसरात २२ अधिकृत फिटमेंट सेंटर उपलब्ध आहेत. त्यामुळे वाहनधारकांना जवळच्या केंद्रावर जाऊन एचएसआरपी बसवून घेता येणार आहे. ३० नोव्हेंबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास तपासणीदरम्यान दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते.