श्रीवर्धनमध्ये निकृष्ट रेशन धान्यप्रकरणी खळबळ pudhari photo
रायगड

Srivardhan ration scandal : श्रीवर्धनमध्ये निकृष्ट रेशन धान्यप्रकरणी खळबळ

महिलांचा संताप उसळला; मंत्री आदिती तटकरे यांच्या संभाव्य कारवाईकडे जनतेचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

श्रीवर्धन : श्रीवर्धन शहरातील प्रभूआळी परिसरातील रास्तभाव धान्य दुकानातून मिळालेल्या तांदळामध्ये अळ्या, उंदराच्या लेंड्या तसेच कबुतरांची पिसे आढळून आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीत मिळणाऱ्या धान्याचा असा निकृष्ट दर्जा हा गंभीर प्रश्न असल्याचे नागरिकांनी सांगितले.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शासकीय गोदामांमध्ये अस्वच्छ वातावरण, भिंतींवरील खपल्या, उंदरांचा उपद्रव आणि दीर्घकाळ ठेवले जाणारे धान्य यांमुळे हे सर्व दूषित होते. त्यामुळे दुकानदाराकडे समस्या नसून धान्य साठवणूक करताना शासकीय यंत्रणेकडून निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. धान्याचे वितरण करण्याआधी काटेकोर तपासणी करणे अत्यावश्यक असल्याची मागणी महिलांनी केली.

स्थानिकांच्या आरोपांनुसार दुकानदार नरेंद्र शिर्के यांनी निकृष्ट धान्याची त्वरित तक्रार नोंदवली नाही, त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई होते का, याबाबत चर्चा सुरू आहे. नागरिकांचे मत आहे की ग्राहकांकडे जाणारे धान्य हे दुकानाच्या देखरेखीखाली असते; त्यामुळे दुकानदाराने गुणवत्ता तपासणे आणि नासक्या धान्याचे स्वीकार न करणे ही जबाबदारी आहे.एकत्र आलेल्या महिलांनी महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना घटनास्थळी बोलावले.

मंत्र्यांच्या उपस्थितीत महिलांनी तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली.काही महिलांनी आरोप केला कि, केवायसी करण्यासाठी आमच्याकडून पैसे घेतले, दर महिन्याचे रेशन मिळत नाही; मग आमच्या हक्काचे धान्य जात कुठे? या गंभीर तक्रारींमुळे प्रकरणाचा स्वरुप अधिक तीव्र झाले आहे.

महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन स्वीकारला नाही.या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन तालुक्यातील जनतेचे लक्ष आता मंत्री आदिती तटकरे कोणती ठोस, कायदेशीर कारवाई करतील याकडे लागले आहे. दोषींवर कारवाई होऊन धान्य वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आल्यानंतरच श्रीवर्धनकरांना ‌‘मोकळा श्वास‌’ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रभूआळी परिसरातील रेशन दुकानातून तांदळात अळ्या, उंदराच्या लेंड्या, पिसे आढळले धान्य शासकीय गोदामातून मिळते; तेथे अस्वच्छता असल्याचा नागरिकांचा आरोप दुकानदार नरेंद्र शिर्के यांनी निकृष्ट धान्य रोखले नाही तपासाची मागणी महिलांचा संताप केवायसीसाठी पैसे घेण्याचा आरोप मंत्री आदितीताई तटकरे घटनास्थळी; कारवाईची अपेक्षा आहे.

नागरिकांना निकृष्ट धान्य मिळणे ही गंभीर व अस्वीकार्य बाब आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई होणारच. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत ढिलाई सहन केली जाणार नाही. जनतेला योग्य व दर्जेदार धान्य मिळणे हीच माझी प्राथमिकता आहे.
मंत्री आदितीताई तटकरे
गोडाऊनमधून धान्य जसे आले तसेच वाटप करण्यात आले. मला धान्यात अळ्या किंवा घाण असल्याची माहिती नव्हती; लक्षात आले असते तर मी लगेच बदलून दिले असते. गोदामातूनच निकृष्ट धान्य मिळाले असावे. याबाबत तपास झाला तर खरी स्थिती समोर येईल.
नरेंद्र शिर्के, रेशनिंग धान्य दुकानदार
धान्यात अळ्या आणि अशी घाण असेल तर हे वाटप कशाच्या आधारावर केले जाते? जनतेला निकृष्ट धान्य देणे म्हणजे थेट फसवणूकच आहे. तपास करून संबंधितांवर तातडीने कारवाई व्हायला हवी. नाहीतर रेशनिंग व्यवस्थेवर विश्वास कसा ठेवायचा?नागरिकांच्या आरोग्याशी खेळला जात आहे.
सावन तवसाळकर, नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT