खाडीपट्टा : रघुनाथ भागवत
कोकण रेल्वेचे सापे-वामने रेल्वे स्टेशन हे पूर्वी केवळ होल्ड स्टेशन होते, ते नव्या स्वरुपात 29 डिसेंबर 2020 पासून स्टेशनमध्ये रुपांतरीत झाले. प्रवाशांसाठी सुविधांनी नटलेली भव्यदिव्य इमारत, तिकिट घर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विज, स्वच्छतागृह आदींनी सुसज्ज झाले असले, तरीही हाय लेवल प्लॅटफॉर्मची सुविधा नसल्यामुळे रेल्वे गाडीतून चढता, उतरताना वारंवार अपघात घडण्याच्या घटना घडत आहेत.
वारंवार होत असलेल्या हाय लेवल प्लॅटफॉर्मच्या मागणीकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे, मात्र आता या गैरसोयीबद्दल नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. महाड शहरापासून 10 किमी अंतरावर असलेले रेल्वे स्टेशन सापे-वामने हे नव्या स्वरुपात विकसित झाले असले, तरी यापुर्वी असलेल्या केवळ होल्ड स्टेशनमध्ये देखील हाय लेव्हल प्लॅटफॉर्म होते.
दुर्दैवाने नविन स्टेशनच्या विकसित कामामध्ये हाय लेवल प्लॅटफॉर्मची सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे रेल्वे गाडीतून चढता, उतरताना नाहक प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागते. केवळ दोन मिनिटे स्टेशनवर थांबणारी रेल्वे या दरम्यान शेकडो उतरणार्या आणि चढणार्या प्रवाशांना अक्षरशः अनेकवेळा उड्या टाकाव्या लागल्या आहेत.
स्टेशनच्या परिसरात वाढले गवत
26 जानेवारी 1998 रोजी कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर केवळ सापे-वामने रेल्वे स्टेशन हॉल्ट म्हणून कार्यान्वित होते. मात्र 29 डिसेंबर 2020 रोजीपासून पूर्णपणे रेल्वे स्टेशनमध्ये रुपांतरीत करण्यात आले. मात्र हाय लेवल प्लॅटफॉर्म अभावी लहान मुले, महिला, गरोदर स्त्रिया, लहान मुलांसह प्रवास करणार्या महिला, दिव्यांग यांना रेल्वेत चढता अथवा उतरता येत नाही. तसेच अपुरी निवारा व्यवस्था, स्टेशनच्या परिसरात गवत वाढलेले आहे, मुख्य रस्त्यापासून स्टेशनला येणारा रस्ता अतिशय खराब म्हणजे पायवाट झाली आहे.
‘सर्व आपल्या भागातील तरुणांना एक विनंती, सर्व एकत्र येऊन एक आंदोलन केले पाहिजे तेव्हा कुठे सरकारला व कोकण रेल्वेला जाग येईल. असे आंदोलन करा एक ट्रेन तिथून गेली नाही पाहिजे.दीपभाऊ सुतार, सापे
‘प्लॅटफॉर्मची उंची वाढवा अन्यथा रेल रोको आंदोलन करावा लागेल. प्लॅटफॉर्म उंची कमी असल्या कारणाने मोठया प्रमाणात दुर्घटना होत आहेत. किती सहन करणार? आता आवाज उठवला पाहिजेच.विजय किजबिले, नडगाव