MHADA Illegal Construction Pudhari
रायगड

MHADA Illegal Construction: मालवणी म्हाडा परिसरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट

प्रत्यक्ष पाहणी, ५० वेळा तक्रार करूनही कारवाई नाही

पुढारी वृत्तसेवा

मालाड: मालाड पश्चिम येथील मालवणी गेट क्रमांक ८ परिसरातील म्हाडाच्या वसाहतीत अनधिकृत वाढीव बांधकामांचा प्रश्न गंभीर बनला असल्याचा आरोप शिव सम्राट फाऊंडेशनने केला आहे. मंजूर आराखडे, विकास नियंत्रण नियम व चटई क्षेत्राच्या (एफएसआय) मर्यादांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असल्याचा दावा संस्थेने केला आहे.

म्हाडा गृहनिर्माण सोसायट्यांत तळमजला अधिक तीन मजल्यांपेक्षा जास्त बांधकामे होत असून काही ठिकाणी सहा मजल्यांवरही वाढीव बांधकामे सुरू असल्याचे फाऊंडेशनचे म्हणणे आहे. या अनधिकृत बांधकामांमुळे भविष्यात दुर्घटनेचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

शिवसम्राट फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार, २०२५ ते २०२६ या कालावधीत म्हाडाचे उपाध्यक्ष, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी, अतिक्रमण निर्मूलन विभाग, कार्यकारी अभियंता आणि मिळकत व्यवस्थापक यांच्याकडे ५० हून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तक्रारींसोबत छायाचित्रे आणि पुरावे सादर करून प्रत्यक्ष पाहणीची मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप ठोस कारवाई झाली नाही.

मुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्र्यांकडेही याबाबत निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, तक्रारी केवळ संबंधित विभागांकडे वर्ग केल्या जात असून प्रत्यक्षात अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याचे संस्थेने म्हटले आहे.

याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन बांधकामे थांबविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, वरून आदेश आल्यानंतरच कारवाई होईल, असे उपअभियंता-२ संतोष कांबळे यांनी सांगितल्याचा दावा शिवसम्राट फाऊंडेशनचे अध्यक्ष सम्राट बागुल यांनी केला आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागासाठी अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक व तोडकाम पथकांवर मोठा खर्च होत असताना अनधिकृत बांधकामे वाढत आहेत.

यामुळे हा विभाग नेमका कोणासाठी, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.मालवणी परिसरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांमुळे परिसराची सुरक्षितता धोक्यात आली असून अनेक जुने रहिवासी स्थलांतराचा विचार करत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

सर्व अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करावी, संबंधितांवर एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि प्रशासनाचे झालेले नुकसान भरून काढावे, अशी मागणी शिव सम्राट फाऊंडेशनने केली आहे.कारवाई न झाल्यास म्हाडा कार्यालयावर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा संस्थेचे अध्यक्ष सम्राट बागुल यांनी दिला आहे.

माझ्याकडे तक्रारी आल्या आहेत. २/३दिवसांत कारवाई केली जाणार आहे. मालवणीसंबंधी प्रकरण काही प्रशासनिक कारणामुळे थांबले आहे.२५ प्रकरणे पेंडिंग आहेत. त्यावर लवकरात लवकर कारवाई केली जाणार आहे.
-संदीप कळंबे, विभागप्रमुख, अतिक्रमण निर्मूलन कक्ष म्हाडा मुंबई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT