लेप्टो pudhari photo
रायगड

लेप्टो-भाग 3

कोकणात भातशेतीच्या लागवड काळात लेप्टोस्पायरोसिसची लागण होण्याचे प्रमाण अधिक असते

पुढारी वृत्तसेवा

डॉ. सचिन जायभाये

गेल्या लेखात आपण लेप्टोस्पायरोसिसच्या लक्षणांबाबत जाणून घेतले. कोकणात भातशेती हा मुख्य व्यवसायांपैकी एक आहे. भातशेतीची लावणी व मशागत यासाठी साचलेल्या पाण्यात उभे राहून काम करावे लागते, हे आपण सगळे जाणतोच. साचलेल्या पाण्यात लेप्टोस्पायरोसिसचे जंतू असतात, त्यामुळे कोकणात भातशेतीच्या लागवड काळात लेप्टोस्पायरोसिसची लागण होण्याचे प्रमाण अधिक असते. या अर्थाने लेप्टोस्पायरोसिसबद्दल माहिती असणे अत्यावश्यक आहे.

लेप्टोस्पायरोसिस हा प्रामुख्याने प्राण्यांचा संसर्गजन्य आजार असून पर्यावरणातील बदल, माणसांचे राहणीमान आणि शेतीच्या विशिष्ट पद्धतीमुळे तो माणसांना होतो. हा संसर्ग जंगली प्राण्यांकडून पाळीव प्राण्यांना आणि पाळीव प्राण्यांकडून माणसांना होतो. तरी उंदीर व घुशी हे आज घडीला लेप्टोस्पायरोसिसचे ते मुख्य संसर्गस्रोत मानले जातात.

थंडीताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, कावीळ आदी लक्षणे असलेल्या रुणांना लेप्टोचे संशयित रुग्ण म्हणून गणले जाऊन निदानाची खात्री करण्यासाठी चाचण्या केल्या जातात. तीव्र स्नायुदुखीच्या रुग्णांना चाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो. वैद्यकीय अहवालांवरून लेप्टोचे निदान केले जाते. वेगवेगळे जीवरासायनिक प्रचल तपासले जाते. चिकित्साविषयक पॅरामीटर्ससोबत जीव रासायनिक पॅरामीटर्स सकारात्मक आल्यास रुग्णाला लेप्टोची लागण झाल्याचे निदान होते.

हे जीव रासायनिक पॅरामीटर्स पुढीलप्रमाणे-इरिथ्रोसाईट्स सेडिमेंटेशन रेट वाढणे, रक्तातील श्वेत पेशींचे प्रमाण वाढणे, रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट्स पेशींची संख्या 1 लाख प्रती क्युबिक मी. मी. पेक्षा कमी होणे, रुग्णाच्या रक्तामधील बिलिरुबिन, लिव्हर एंझाइमचे प्रमाण वाढणे, रुग्णाच्या रक्तामधील युरिया व क्रियाटिनिनचे प्रमाण वाढणे. आजाराच्या पहिल्या सात दिवसांत आणि प्रतिजैविके उपचारापूर्वी ब्लड कल्चर अभ्यासासाठी नीलेतले रक्त घेतले जाते. सात दिवसांनंतर लेप्टोस्पायरा रक्तातून नाहिशा होतात. त्यामुळे ब्लड कल्चर स्टडीनंतर करता येत नाही. परंतु संसर्गानंतर 10 दिवसांनी सीरोडायग्नोसिस करणे शक्य होते. कारण या कालावधीत प्रतिपिंडे रक्तामध्ये आढळून येतात. रक्तरसशास्रीय अभ्यास लेप्टोस्पायरोसिसच्या निदानसाठी योग्य तपासणी असते.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसेज, नवी दिल्ली या संस्थेने रोगनिदानसाठी किट तयार केली आहे. तपासणीस घेतलेल्या रक्त नमुन्याचा योग्य साठा व वापर जरूरीचे असते. लेप्टोची लक्षणे आणि मायक्रोअग्लुटिनेशन चाचणी, डिपस्टिक एलिसा किंवा डॉट एलिसा चाचणीद्वारे आय. जी. एम. प्रतिपिंडे आढळून येणे. आय. जी. एम. प्रतिपिंडे आढळून आल्यास लेप्टोसंसर्ग तीव्र स्वरूपाचा आणि नुकताच झालेला असल्याचे गृहित धरले जाते. आय.जी.जी. प्रतिपिंडे आढळून आल्यास पूर्वी कधीतरी लेप्टोस्पायरांचा संसर्ग होऊन गेल्याचा तो पुरावा मानला जातो.

रुग्णामध्ये आजाराच्या 10 व्या दिवसांपासून ते चार आठवड्यांपर्यंत लेप्टोस्पायरा असल्याचे आढळून येते. आजाराच्या चौथ्या ते दहाव्या दिवसांच्या दरम्यान ह्या द्रवामधे लेप्टोस्पायरा असू शकतात. या द्रवाची डार्क फिल्ड मायक्रोस्कोपीद्वारे तपासणी केल्यास त्यामध्ये लेप्टोस्पायरा दिसू शकतात. लेप्टोच्या उपचारासाठी अनेक प्रतिजैविके उपलब्ध आहेत. प्रतिजैविकांची थेरपी लवकरात लवकर म्हणजेच आजाराच्या पहिला पाच दिवसांत सुरू करायला हवी. प्रयोगशाळा चाचण्यांचा अहवाल येईपर्यंत थांबणे योग्य ठरत नाही.

काही रुग्णांना लेप्टोच्या आजारातून बाहेर पडण्यास काही आठवडे किंवा काही महिने लागू शकतात. तर काही रुग्णांना नेहमी अशक्तपणा, डोकेदुखी, मानसिक आजार इत्यादी त्रास वारंवार सतावत राहतो. डोळ्यांमध्ये सुद्धा अनेक गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. लेप्टोस्पायरोसिस आजारात रुग्ण मृत्यूचे प्रमाण 5 ते 30 टक्क्यांपर्यंत असते. चांगली आरोग्य सेवा आणि आधुनिक उपचार पद्धतीमुळे या आजारामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी झालेले आहे. मूत्रपिंड निकामी होणे, रक्तस्राव होणे आणि हृदयक्रिया बंद पडणे ही आजारामुळे होणार्‍या मृत्यूची काही प्रमुख कारणे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT