नीती मेहेंदळे
मराठवाडा विभाग महाराष्ट्रातला स्थापत्याने अधिक संपन्न आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. इथल्या मंदिरांची महती वर्णावी तर तो एक स्वतंत्र विषयच आहे. किल्ल्यांचा विषय चर्चेला घ्यावा, तर महाराष्ट्रात सगळ्या प्रकारचे किल्ले सापडतात. पश्चिम महाराष्ट्रात जलदुर्ग आहेत, किनारी दुर्ग आहेत, सह्याद्री, सातपुडा पर्वतांमुळे अरण्यदुर्ग आणि शैलज दुर्ग आहेत, तर सपाट पठारी प्रदेशसुद्धा आहेत तिथे भुईकोट किल्ले आहेत. उस्मानाबाद म्हणजेच आजच्या धाराशिव जिल्ह्यातला मराठवाडा विभागातला नळदुर्ग किल्ला हा या भुईकोटांमधला सर्वात मोठा भुईकोट आणि मध्ययुगीन स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना समजला जातो. आज नळदुर्ग हे महाराष्ट्र राज्याचे पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे संरक्षित स्मारक आहे.
इतिहासाचा धांडोळा घ्यायचा झाला तर प्रचलित जलश्रुतीनुसार नळराजाने किल्ला बांधला म्हणून या स्थानाचे व किल्ल्याचे नाव नळदुर्ग असे रूढ झाले असे समजते. हा मूळ किल्ला कल्याणीच्या चालुक्य काळात बांधण्यात आला असल्याची नोंद सापडते. कल्याणीच्या चालुक्य शासकांचा एक दास असलेल्या हिंदू राजाने तो बांधला होता. नंतर तो इ.स. 1351 ते इ.स. 1480 मध्ये बहामनी सल्तनतच्या अधिपत्याखाली आला. पुढे इ.स. 1558 मध्ये, आदिलशाही राजवंशाने नळदुर्गाचा ताबा घेतला आणि त्याचे रूपांतर भव्य बुरुज, भव्य भिंती आणि सक्षम संरक्षण यंत्रणा असलेल्या एका सुदृढ स्थापत्यात केले.
या काळात या किल्ल्यास दगडी चिर्यांची मजबूत तटबंदी बांधण्यात आली. त्यांच्या कारकिर्दीत किल्ल्याची वास्तुकला भरभराटीला आली, ज्यामध्ये पर्शियन आणि दख्खन प्रभावांचे मिश्रण झाले. इब्राहिम आदिलशहा दुसरा याच्या काळात इ.स. 1613 मध्ये बोरी नदीवर बंधारा बांधून पाणी महालाचे बांधकाम करण्यात आले. पाणीमहाल हे तत्कालीन स्थापत्यशैली व अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
नळदुर्ग शहर उस्मानाबादपासून सुमारे 50 किलोमीटर आग्नेयेस वसलेले असून नळदुर्ग किल्ल्याला भौगोलिक महत्त्व आहे. तो बोरी नदीच्या खोर्यात असलेल्या बेसाल्ट खडकाच्या टेकडीवर बांधला आहे. इंडो-इस्लामिक स्थापत्य शैलीत बांधलेला, नळदुर्ग किल्ला विस्तृत क्षेत्रात पसरलेला आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे बेसॉल्ट खडकाच्या टेकडीवर बांधलेली त्याची तटबंदी, ज्यावरून बोरी नदीच्या खोर्याचे अतुलनीय दृश्य दिसते. किल्ल्याचा एकूण घेर अंदाजे दीड मैल आहे. नळदुर्ग किल्ल्याचे क्षेत्रफळ 80 एकरांवर पसरलेले आहे.
किल्ल्याच्या संरक्षणार्थ तीन बाजूंनी मजबूत तटबंदी असून आणि तीत जड तोफा बाळगण्यास सक्षम मोठे बुरुज आहेत. ही तटबंदी जवळ जवळ 3 किमी लांब आहे आणि तिला 114 दणकट बुरुज आहेत. यात परांडा बुरुज, उपळी बुरुज, संग्राम बुरुज, पुणे बुरुज, नगर बुरुज, संगम बुरुज, बंध बुरुज, नवबुरुज इ. मुख्य बुरुज. उपळी बुरुज हे किल्ल्यातले सर्वात उंच ठिकाण आहे. बुरुजांच्या विविध आकारांचे प्रयोग नळदुर्गमध्ये करण्यात आले आहेत. काही ठिकाणी षटकोनी, पंचकोनी, चौकोनी, अर्धवर्तुळाकार तर काही ठिकाणी नऊ पाकळ्र्यांसारख्या बुरुजाची निर्मिती करण्यात आली आहे. यातील काही बुरुजांवर तोफा आजही आहेत. यात हत्ती तोफ आणि मगर तोफ या प्रमुख तोफा आहेत.
किल्ल्यात प्रवेशाकरिता हुलमुख दरवाजा हे प्रमुख प्रवेशद्वार आहे. एका प्रवेशद्वाराचे नाव हाथी दरवाजा असून हे दोन्ही दरवाजे चिन्हांकित आहेत. किल्ल्याच्या आतील भागात अंबरखाना, मुन्सिफ कोर्ट, मशीद, बारादरी, राणीमहाल, रंगमहाल, हत्ती तलाव, मछलीतट इ. तत्कालीन वास्तू अवशेष आहेत. भुईकोटला खंदक हा हवाच म्हणून नळदुर्गच्या अवतीभवती बोरी नदीचे पात्र वळवून त्याचा खंदक म्हणून उपयोग केला आहे. यामुळे किल्ला आपोआपच नैसर्गिकरित्या संरक्षित झाला आहे. ही नदी प्रत्यक्षात तुळजापूरहून वाहत येते. या नदीवर म्हणजेच खंदकावर दुसर्या आदिलशहाच्या काळात एक बंधारा बांधला आहे.
या बंधार्याच्या एका टोकाला नळदुर्ग तर मूळच्या नळदुर्ग किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी खंदकाच्या दुसर्या टोकाला जोड किल्ला बांधण्यात आला आहे, याचे नाव “रणमंडळ” हा बंधारा 174 मी. लांब, अडीच ते 14 मी. रुंद आणि 19 मी. उंच आहे. या बंधार्याच्या आतमध्ये छोटासा राजवाडादेखील बांधला आहे आणि त्यात उतरण्यासाठी पायर्या बांधलेल्या आहेत. बंधारा पूर्ण भरल्यावर नदीचे पाणी ह्या बंधार्यावरून वाहते, पण आतील भागात असणार्या एका वास्तूलासुद्धा त्याचा स्पर्श होत नाही.
या किल्ल्यातील सर्वात आकर्षक वास्तू म्हणजे ‘पाणीमहाल’ पावसाळ्यात बोरी नदीचे पाणी या पाणी महालावरून पडते, तेव्हा महालाच्या गवाक्षात उभे राहून समोरचा पाण्याचा पडदा पाहण्यास एक वेगळीच मजा येते. या पाणीमहालाच्या निर्मात्याचे नाव आहे. मीर इमादीन, नळदुर्ग गावात शिरल्यावर किल्ल्याकडे जाणार्या वाटेने वस्ती ओलांडली की, या खंदकावरील पूल लागतो. त्यावरून किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारात शिरता येते. हे प्रवेशद्वार दोन भव्य बुरुजांमध्ये बसविलेले आहे. याच बुरुजांमधून किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वारसुद्धा काढले आहे. यातून आत शिरल्यावर डावीकडे पहारेकर्यांच्या देवड्या लागतात.
समोरची वाट सध्या भिंत घालून बंद केलेली आहे. त्यामुळे इंग्रजी ‘यू’ आकाराचे वळण घेऊन दोन तटबंदीच्या मधून ही नागमोडी वाट जाते. डावीकडच्या बुरुजामध्ये किल्ल्याचे तिसरे अर्थात मुख्य प्रवेशद्वार उभे आहे. तिथे जाण्याअगोदर उजवीकडे वळून पायर्या चढून शेरहाजीच्या वर गेले की किल्ल्याच्या दुहेरी तटबंदीचे सुंदर दर्शन होते. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वाराच्या लाकडी फळ्या आजही शिल्लक आहेत. सध्या गड पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. या प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूसही बुरुजामध्ये खोल्या केलेल्या आहेत.
आत शिरल्यावर डावीकडच्या बाजूने दरवाजाच्या बाजूला असणार्या बुरुजांवर जाता येते. आत गेल्यावर समोरच तीन तोफा पडलेल्या दिसतात. यापैकी आडव्या ठेवलेल्या तोफेची लांबी साधारणपणे 27 फूट आहे. त्याच्या मागे हत्तीखान्याची इमारत आहे. याच्या समोरच एक मोठे शिल्प ठेवलेले आहे. या इमारतीच्या मागे थोडे अंतर चालून गेल्यावर किल्लेदाराचा वाडा लागतो. या वाड्यामध्ये पूर्वी नळदुर्गचे महाविद्यालय भरत असे. आता यात काही शिल्पं विखुरलेली दिसतात. याच्याच बाजूला ‘मुन्सीफ कोर्टची‘ इमारत आहे.
या वाड्याच्या एका बाजूला ‘जामा मशीद‘ आहे. याच्या समोरच एक हौद आहे. किल्ल्यात काही लोकांची वस्ती आहे. किल्लेदाराच्या वाड्याच्या उजवीकडे गेल्यावर समोरचा बुरुज लक्ष वेधून घेतो. या बुरुजाचा आकार लक्षात घ्यायचा असेल तर तो नळदुर्ग - हैद्राबाद रस्त्यावरून पाहावा. याचा आकार कमळाच्या पाकळ्यांसारखा दिसतो. यालाच ‘नऊ पाकळ्यांचा‘ किंवा ‘नवबुरुज‘ असे ही म्हणतात. आतमधील बाजूने हा बुरुज दुमजली आहे. ही बुरुजाची रचना दुर्मीळ आहे.
किल्ल्यातील आणखी एक आकर्षक वास्तू म्हणजे ‘उपळ्या बुरुज’ यालाच उपळी बुरूज असेही म्हणतात. याची साधारणपणे उंची दीडशे फूट आहे. संपूर्ण नळदुर्गचा किल्ला आणि रणमंडळ किल्ला पाहण्यास एक दिवस लागतो. अभियांत्रिकीचा एक उल्लेखनीय पराक्रम असलेला हा नळदुर्ग किल्ला बोरी नदीवरील धरणावर पाय रोवून आजही भक्कम उभा आहे.
किल्ल्याभोवती असलेल्या तलावात अनेक स्थलांतरित पक्षी येतात. त्यांच्या नैसर्गिक अधिवासात, स्थलांतरित पक्षी पाहणे हे निराळंच कवतिक आहे. इथून फक्त 35 किमी अंतरावर, तुळजाभवानी मंदिर आहे. बोरी नदीच्या संगमाजवळ वसलेले हे नळदुर्ग शहर त्याच्या तटबंदी, वास्तुकला व सांस्कृतिक वारशामुळे आजही ऐतिहासिक महत्त्व राखून आहे.